Nagpur Cyber Fraud: राज्यांमध्ये नोकरी शोधणाऱ्यांना फसवून लुटणाऱ्या सायबर फसवणूक टोळीचा नागपूर पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. या टोळीचा म्होरक्या चीन किंवा कंबोडिया येत असण्याची दाट शक्यता आहे. या टोळीने देशभरातील 21 राज्यांमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना खोट्या व्यावसायिक आश्वासनांनी फसवले, त्यांच्या नावावर बनावट बँक खाती उघडली आणि त्या खात्यांचा वापर 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या बेकायदेशीर ऑनलाइन गेमिंग, सट्टेबाजी, हवाला आणि मनी लाँड्रिंगसाठी केला, असा पोलिसांचा अंदाज आहे.
काय आहे प्रकरण?
गोंदिया येथील 28 वर्षीय तरुण दीपक गायधने यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. गायधने यांची ओळख यातील एक आरोपी सुमित पटले याच्याशी एका मित्राद्वारे झाली होती. मशिनरी टूल्सच्या व्यवसायात नफा मिळवून देण्याच्या आमिषाने गायधने यांनी आपले आधार आणि पॅन कार्ड या टोळीच्या हवाली केले. त्यावर या टोळीने गायधने यांच्या नावावर 'दीपक एंटरप्रायझेस' ही बनावट फर्म स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲक्ट अंतर्गत नोंदवली आणि एका बँकेच्या हिंगणा शाखेत चालू खाते उघडले.
Delhi Blast : सकाळी 3000 किलो स्फोटके आणि संध्याकाळी दिल्लीत स्फोट! काय आहे फरिदाबाद लिंक?
गायधने यांच्या नकळत, 13 ते 27 ऑक्टोबर दरम्यान या खात्यातून UPI, RTGS आणि IMPS द्वारे तब्बल एक कोटी 73 लाख रुपयांचे व्यवहार करण्यात आले. आता पोलिस तपासातून उघड झाले आहे की ही टोळी विविध बँकांमध्ये अशी सुमारे 80 बनावट करंट म्हणजे चालू खाती चालवत होती. एजन्सिजची दिशाभूल करण्यासाठी हे पैसे अनेक खात्यांमधून फिरवले जायचे आणि शेवटी 'हवाला' मार्गे अमेरिकन डॉलर्समध्ये रूपांतरित केले जायचे.
पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी सांगितले की या फसवणुकीचे मुख्य सूत्रधार चीन किंवा कंबोडियामध्ये असण्याची शक्यता आहे. या मास्टरमाईंड्सचा माग काढण्यासाठी केंद्रीय एजन्सीची मदत घेतली जात आहे. पीडितांच्या फोनवर OTP चोरण्यासाठी चायनीज भाषेतील APK फाईल्स पाठवल्या जात होत्या, तर टोळीचे सदस्य Telegram आणि WhatsApp वरून समन्वय साधत होते. राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलनुसार, 21 राज्यांमध्ये अशा 174 तक्रारींची नोंद झाली आहे, त्यापैकी 25 तक्रारकर्ते एकट्या महाराष्ट्रात आहेत.
२३ जणांना अटक
नागपुरात सहा इतर पीडितांना अशाच प्रकारे फसवण्यात आले होते. पोलिसांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि ओडिशा येथून एकूण 28 आरोपींपैकी 23 जणांना अटक केली आहे. उर्वरित पाच आरोपींचा शोध सुरू आहे. या कारवाईत सुमारे साडे 17 लाख रुपयांची बीएमडब्ल्यू कार आणि 53 लाख रुपयांची बँक शिल्लक असलेली खाती गोठवण्यात आली आहे. याशिवाय 8 दुकाने आणि आस्थापना प्रमाणपत्रे, 9 बनावट भाड्याचे करारपत्र, 61 चेकबुक, 50 सिम कार्ड, 38 मोबाईल, 14 दुकानांचे फलक, रबर स्टॅम्प आणि बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली.
Delhi Blast : शक्तीशाली स्फोटानं लाल किल्ला हादरला! 'दहशतवादी अँगल'ची शक्यता? वाचा 10 मोठे मुद्दे
दरम्यान, आपल्या मोबाईलवर कोणी ए पी के फाईल पाठवली तर ती अजिबात क्लिक करू नका किंवा उघडण्याचा प्रयत्न करू नका, तसेच कुणालाही आपली आधार किंवा पॅन कार्ड या सारखी महत्त्वाची कागदपत्रे सोपवू नका, कारण त्याचा गैरफायदा घेतला जाण्याची अधिक शक्यता आहे, असे आवाहन पोलिसांनी केली आहे.