Nagpur News : जेवणात विभूती आणि महाराजांकडे राहण्याची सक्ती, नागपूरच्या इंजिनियर तरुणीच्या मृत्यूचे कारण उघड!

Nagpur News: विज्ञानाच्या युगात आपण वावरत असतानाही अंधश्रद्धेचा विळखा किती घट्ट असू शकतो, हे नागपूरच्या एका घटनेने समोर आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नागपूर:

Nagpur News: विज्ञानाच्या युगात आपण वावरत असतानाही अंधश्रद्धेचा विळखा किती घट्ट असू शकतो, हे नागपूरच्या एका घटनेने समोर आले आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअर असलेल्या 28 वर्षांच्या उच्चशिक्षित रिया गंधेवार या तरुणीचा दुर्दैवी अंत झाला आहे. मात्र, तिच्या निधनानंतर तिच्या आईने सासरच्या मंडळींवर केलेले आरोप ऐकून कोणाचेही मन सुन्न होईल. 

काय आहे प्रकरण?

रियाचे लग्न 20 नोव्हेंबर 2021 रोजी गडचिरोलीतील सुमित गंधेवार याच्याशी झाले होते. सुमित स्वतः बी फॉर्म असून कंत्राटदार म्हणून काम करतो, तर त्याचे वडील पोलीस अधीक्षक कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आहेत. असे सुशिक्षित कुटुंब असतानाही रियाच्या आईने लावलेले आरोप धक्कादायक आहेत. 

Advertisement

रियाला लग्नानंतर डिप्रेशनचा त्रास सुरू झाला होता. या आजारावर डॉक्टरांकडे उपचार करण्याऐवजी सासरच्या मंडळींनी एका स्वघोषित महाराजाचा रस्ता धरला. चामोर्शी जवळील हरणघाट येथील कार्तिक स्वामी महाराजांकडे रियाला 8 ते 10 दिवस जाऊन राहण्यासाठी सासरकडून दबाव टाकला जात होता, असा गंभीर दावा रियाच्या आईने केला आहे.

विभूती आणि कुंडलीचे विचित्र तर्क

अंधश्रद्धेचा हा प्रकार केवळ इथपर्यंतच थांबला नाही. रियाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, रियाच्या जेवणाच्या ताटात चोरून या महाराजांची विभूती टाकली जात असे. सासरच्या लोकांचे असे मत होते की, लग्न करताना कुंडली जुळवली नसल्यामुळे होणारी मुले लुळी-पांगळी जन्माला येतील. 

हा विचार या तथाकथित महाराजांनीच त्यांच्या मनात भरवला होता, असा आरोप करण्यात आला आहे. या सततच्या मानसिक त्रासामुळे आणि अपमानास्पद वागणुकीमुळे रियाला शेवटी सासर सोडून आपल्या आईकडे यावे लागले होते.

( नक्की वाचा : NEET paper leak : नाव मेडिकलला, पण कनेक्शन पेपर लीकच्या टोळीशी! नाशिकच्या शुभम खैरनारची 'कुंडली' आली समोर )
 

हृदय पिळवटून टाकणारे व्हिडिओ व्हायरल

रियाचा 10 एप्रिल 2026 रोजी नागपुरात मेंदू ज्वराने मृत्यू झाला. मात्र, तिच्या मृत्यूनंतर आता काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमध्ये रिया ओक्साबोक्शी रडताना दिसत आहे. 

Advertisement

ती तिच्या नवऱ्याला फोन उचलण्यासाठी आणि घरी येण्यासाठी अक्षरशः विनवण्या करत आहे. एक सुशिक्षित इंजिनिअर मुलगी आपल्या पतीच्या प्रेमासाठी आणि संसारासाठी इतकी हतबल कशी झाली, हा प्रश्न हे व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला पडत आहे.

( नक्की वाचा : Pune News: आई-वडिलांचं मौन मुलीच्या जीवावर बेतलं; पुण्यात 18 वर्षांच्या श्रुतीचा भयंकर शेवट ! नेमकं काय घडलं? )

महाराजांच्या आश्रयाचा अट्टहास

सासरच्यांनी तिला हरणघाटच्या मंदिरात नेऊन सोडण्याची पूर्ण तयारी केली होती, असा आरोप तिची आई माधुरी पोतवार यांनी केला आहे. आजारपणात वैद्यकीय उपचारांची गरज असताना तिला महाराजांच्या आश्रयाला पाठवण्याचा अट्टहास का धरला गेला, हा आता मोठा प्रश्न ठरला आहे. या घटनेमुळे उच्चशिक्षित समाजातील अंधश्रद्धेचा भयानक चेहरा पुन्हा एकदा समोर आला असून एका तरुण मुलीच्या आयुष्याचा दुर्दैवी शेवट झाला आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article