- संजय तिवारी, प्रतिनिधी
Nagpur News: नागपुरात एका 24 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि जादूटोणा करून सक्तीने धर्मांतर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या या पीडितेच्या पेयात गुंगीचे औषध देऊन आरोपी अय्याज मदारे नावाच्या व्यक्तीने आक्षेपार्ह व्हिडीओ बनवले आणि 4 लाख रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर काळी जादू आणि संमोहनाचा वापर करत तिच्यावर वारंवार बलात्कार केला तसेच बळजबरीने 'निकाह' लावून धर्मांतर करण्यास भाग पाडले. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी दोन आरोपींना अटक करण्यासह एका व्हिडीओची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.
गूढ धार्मिक वाक्यांचा उच्चार करत धर्मांतरण आणि संमोहन प्रक्रिया केल्याचा आरोप
या प्रकरणी महिलेचे दोन्ही हात धरून गूढ धार्मिक वाक्यं उच्चारतानाचा व्हिडीओ आला समोर आहे. पोलिसांद्वारे व्हिडीओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. नागपूर शहरातील एका 24 वर्षीय विवाहित महिलेने तिच्या शाळेतील एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीवर आणि त्याच्या साथीदारांवर बलात्कार, ब्लॅकमेल आणि सक्तीने धार्मिक धर्मांतर केल्याचा आरोप करत सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तिसरा आरोपी सध्या फरार आहे. महिलेने सोनेगाव पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला असून पोलिसांनी मुख्य आरोपी अय्याज ताज मदारे आणि त्याचा साथीदार अमीन शेख याला अटक केली आहे. आणखी एक हजरत मौलाना नावाने उल्लेख झालेला तिसरा आरोपी फरार आहे.
ब्लॅकमेलिंग आणि पैशांची खंडणी
या प्रकरणी दाखल झालेल्या एफआयआर (FIR) नुसार आरोपी अय्याज मदारे याने शहराबाहेर कार्यरत असलेल्या एका सुरक्षा दलातील जवानाच्या पत्नीशी (तक्रारदार महिला) एका मित्रासाठी मालमत्ता खरेदी करण्याच्या बहाण्याने पुन्हा मैत्री केली होती. महिलेचा रिअल इस्टेटचा (मालमत्ता खरेदी-विक्री) व्यवसाय आहे.
8 फेब्रुवारी 2025 रोजी एका हॉटेलमधील बैठकीदरम्यान अय्याजने तिच्या पेयामध्ये गुंगीचे औषध मिसळल्याचा आरोप आहे, ज्यामुळे ती बेशुद्ध पडली. जेव्हा ती शुद्धीवर आली, तेव्हा आरोपीने तिचे आक्षेपार्ह स्थितीतील फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्ड केले होते. हे व्हिडीओ पतीला पाठवण्याची आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला ब्लॅकमेल करू लागला. या भीतीने आरोपीने महिलेकडून हळूहळू तब्बल 4 लाख रुपये देखील उकळले.
महिलेने एफआयआरमध्ये आरोप केला आहे की, अय्याज अनेकदा एका प्लास्टिकच्या बाटलीत काहीतरी द्रव घेऊन यायचा आणि तिला ते पिण्यास भाग पाडायचा. त्यानंतर तो उर्दूमध्ये काहीतरी पुटपुटायचा, तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारायचा आणि 'हा संमोहन (Hypnosis) आणि काळी जादू (Black Magic) आहे' असे सांगून तिच्यावर बलात्कार करायचा.
(नक्की वाचा : Crime News: गरोदर मातांच्या पोषण आहारावर डल्ला! इस्लाम पार्टीच्या नेत्याचा कारनामा; रेशनिंगचा काळाबाजार उघड)
सक्तीने धर्मांतर, निकाह आणि बळजबरीने मांसाहार
तक्रारीत नोंदवलेल्या आणखी एका घटनेत 31 मे रोजी मदारे आणि त्याच्या साथीदाराने महिलेला सक्तीने कळमेश्वर येथे नेले. तिथे मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील तामिया गावचा तिसरा आरोपी हजरत मौलाना याने काही धार्मिक विधी केले आणि तिला बळजबरीने 'कबुल है, कबुल है' म्हणायला लावून धर्मांतर करण्यास भाग पाडले.
महिलेने सांगितले की, तिच्या इच्छेविरुद्ध या सर्व गोष्टी करण्यात आल्या. या विधीनंतर मौलाना याने तिचे इस्लाममध्ये धर्मांतर झाल्याचे आणि अय्याजसोबत तिचा 'निकाह' झाल्याचे घोषित केले. यावेळी तिला बळजबरीने मांस खाऊ घालण्यात आले. त्यानंतर या टोळीने तिला एका हॉटेलमध्ये नेले, जिथे अय्याजने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. यानंतरही आरोपी तिच्या घरी येऊन वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार करत राहिले. सुरुवातीला भीतीपोटी महिलेने या घटनेची कुठेही वाच्यता केली नव्हती. पण नंतर तिने आपल्या पतीला याबद्दल माहिती दिली आणि सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
(नक्की वाचा : Palghar News: पालघरमध्ये तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला,आरोपीचे आत्महत्येचे दोन प्रयत्न फसले,नेमकं काय घडलं?)
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून यात जादूटोणा विरोधी कायद्यान्वये देखील कलमे लावण्यात आली आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे फॉरेन्सिक विश्लेषण केले जात आहे, पैशांच्या व्यवहारांची पडताळणी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.