Nagpur News : नागपूरच्या वानाडोंगरी भागात प्रेमप्रकरणाचा एक दुर्दैवी शेवट समोर आला आहे. कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिल्याने व्यथीत झालेल्या प्रेमी युगुलाने विषारी पदार्थ प्राशन केलं. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. कुटुंबीय आणि नातेवाईक हळहळ व्यक्त करत आहेत.
कुटुंबाचा विरोध प्रेमी युगुलाचं धक्कादायक पाऊल...
मृत तरुणाची ओळख २१ वर्षीय विशाल विलास जवादे अशी पटली आहे. तो मंडप डेकोरेशनच्या कामासोबतच ऑटो रिक्षाही चालवायचा. गेल्या चार वर्षांपासून त्याचे त्याच परिसरात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनाही लग्न करायचं होतं आणि त्यांनी आपल्या कुटुंबीयांकडे तशी इच्छा व्यक्तही केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही कुटुंबांनी या नात्याला विरोध केला होता. रविवारी या मुद्द्यावरून दोन्ही कुटुंबांत वादही झाला होता. त्यानंतर सोमवारी दुपारी दोघेही वानाडोंगरी ते संगम गाव मार्गावरील एका मैदानात पोहोचले आणि त्यांनी सोबत आणलेला विषारी पदार्थ प्राशन केला.
रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी दोघांना रुग्णालयात हलवलं...
विषारी पदार्थाचे प्रमाण जास्त असल्याने विशालची प्रकृती घटनास्थळीच बिघडली. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी दोघांना तत्काळ शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल केले. मात्र, रात्री ११ च्या सुमारास उपचारादरम्यान विशालचा मृत्यू झाला. तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस रुग्णालयात दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तरुणाच्या मृत्यूची बातमी समजताच त्याचे सहकारी ऑटो चालक रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी तरुणीच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न केला, परंतू पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून परिस्थिती शांत केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.