Nagpur News : पहाटे 5.30 ची वेळ, RPF-GRP समोरच तरुणाचं प्राणघातक पाऊल; काही क्षणात करंटचा विळखा

नागपूर रेल्वे स्थानकावर मंगळवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि थरारक अपघात समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nagpur News : नागपूर रेल्वे स्थानकावर मंगळवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि थरारक अपघात समोर आला आहे. स्थानकाच्या यार्डमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीवर चढलेल्या एका अज्ञात तरुणाचा हाय व्होल्टेज ओव्हरहेड विजेच्या तारेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तरुणाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र दुसऱ्या मालगाडीवर उडी मारताच तो करंटच्या विळख्यात सापडला. सध्या आरपीएफ (RPF) आणि जीआरपी (GRP) या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ही घटना मंगळवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण स्टेशन यार्डमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीवर चढला आणि वरून जाणाऱ्या ओएचई (OHE) हाय व्होल्टेज लाईनच्या दिशेने जाऊ लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने संबंधित लाईनचा वीज पुरवठा खंडित केला आणि तरुणाला सुरक्षित खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले.

Advertisement

नक्की वाचा - Nagpur News : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमानंतर परिसरात चाकू हल्ल्याची खळबळजनक घटना, एकाचा मृत्यू

रेल्वे कर्मचाऱ्यांकडून वाचवण्याचे प्रयत्न, पण अपयश

परंतु, याच दरम्यान तरुणाने अचानक पहिल्या मालगाडीवरून शेजारच्या ट्रॅकवर उभ्या असलेल्या दुसऱ्या मालगाडीवर उडी मारली. दुर्दैवाने, ज्या लाईनवर दुसरी मालगाडी उभी होती, तिथला वीज पुरवठा सुरूच होता. तरुण हाय व्होल्टेज तारेच्या संपर्कात येताच त्याला विजेचा तीव्र धक्का बसला आणि तो होरपळला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच आरपीएफ आणि जीआरपीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, मृत तरुणाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच तो मालगाडीवर का चढला होता आणि या घटनेमागील नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत.