Nagpur News: लग्नाचे आमिष, अल्पवयीनचे लैंगिक शोषण आणि बालविवाह! एका कारवाईने उघडले नराधमाचे काळे कारनामे

Nagpur News: नागपूरमधील कोंढाळी येथे अल्पवयीन मुलीचे शोषण करणाऱ्या तरुणाचा बालविवाह प्रशासनाने रोखला. तसेच त्याच्या 17 वर्षीय बहिणीचाही होणारा बालविवाह उधळून लावला. वाचा सविस्तर बातमी.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Nagpur News: अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणारा 'नवरोबा' फरार"
NDTV Marathi

Nagpur News: लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाचे कारस्थान चव्हाट्यावर आले आहे. या तरुणाचा आता दुसऱ्या अल्पवयीन मुलीशी विवाह करण्याचा बेत असतानाच, जिल्हा बाल संरक्षण कक्षाने धडक कारवाई करत त्याचे मनसुबे उधळून लावले आहेत. या कारवाईदरम्यान प्रशासनाला एकाच कुटुंबातील दोन बालविवाह रोखण्यात यश आले असून, नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

एकाच कुटुंबात दोन बालविवाह

संबंधित 19 वर्षीय तरुणाने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे वारंवार लैंगिक शोषण केले. यानंतर तिला वाऱ्यावर सोडून देऊन हा युवक दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत विवाह करण्याच्या तयारीत होता. याबद्दलची गोपनीय माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाइन (1098), पोलीस आणि संबंधित विभागाच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकला.

Advertisement

(नक्की वाचा: CIDCO News: नवी मुंबईत खळबळ! सिडकोच्या महत्त्वाच्या फाइल गायब, लाखो नागरिकांच्या मालमत्तेवर टांगती तलवार?)

धक्कादायक वास्तव: बहिणीचाही बालविवाह

छाप्यादरम्यान तो युवक घरी सापडला नाही, पण तपासणीत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. या युवकाच्या स्वतःच्या 17 वर्षीय अल्पवयीन बहिणीचाही साखरपुडा झाला असून तिचाही बालविवाह लावून देण्याची तयारी कुटुंबाने केली होती. प्रशासनाने तत्काळ पावले उचलत दोन्ही बालविवाह रोखले आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.

(नक्की वाचा: Chandrapur News: चंद्रपुरात हळहळ! शाळेची तयारी करत असतानाच 10 वर्षाच्या मुलाला हार्टअटॅक अन् पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली)

जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली. पीडित मुलीच्या लैंगिक शोषणाबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षाने तक्रार नोंदवली असून कोंढाळी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. या कारवाईने परिसरात बालविवाह करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.