संजय तिवारी
दोन चिमुकले शाळा सुटल्यानंतर घरी आले. त्यानंतर ते खेळण्यासाठी म्हणून बाहेर पडले. पण घरी परतलेच नाहीत. जेव्हा त्यांची शोधाशोध झाली तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक तालुक्यातील खैरी बिजेवाडा इथं ही घटना घडली. पाचगाव येथे शनिवारी सायंकाळी ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. उत्कर्ष लोकेश लांजेवार आणि रिधान संजय सहारे ही सात वर्षाची मुलं शाळा सुटल्यानंतर खेलण्यासाठी बाहेर गेली होती. पण घरी आली नाहीत. त्यावेळी त्यांची शोधाशोध करण्यात आली. त्यावेळी या दोघांचेही मृतदेह गावकऱ्यांना सापडले.
खैरी बिजेवाडा पाचगाव या गावात उत्कर्ष लोकेश लांजेवार आणि रिधान संजय सहारे हे दोघे राहत होते. दोघेही दुपारी शाळेतून घरी परतले. सायंकाळी जेवण केल्यानंतर खेळायला ते घराबाहेर गेले. घरा जवळच काही अंतरावर असलेल्या खड्ड्या जवळ ते गेले होते. त्या खड्ड्यात ते पोहण्यासाठी उतरले. दिवसभर पाऊसामुळे खड्ड्यात पाणी साचले होते. पाणी खेळण्यासाठी पायातील चप्पल बाहेर काढून ते खड्ड्यात उतरले.
नक्की वाचा - Ladki Bhahin Yojana: लाडक्या बहीण योजनेतून आता 26 लाख लाडक्या बहीणी आऊट, दिलं 'हे' कारण
मात्र खड्डा खोल असल्याने त्या दोन्ही मुलांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते गटांगळ्या खावू लागले. त्यात ते दोघे ही पाण्यात बुडाले. खेळायला गेले मात्र उशिरापर्यंत घरी परतले नसल्यानं घरचे चिंतेत पडले होते. गावात ही गोष्ट वाऱ्या सारखी पसरली. गावकरी त्यांना शोधण्यासाठी बाहेर आले. घराजवळच काही अंतरावर खड्ड्याजवळ दोन्ही मुलांच्या चपला दिसून आल्या. त्यावेळी एकाने खड्ड्यात उतरून पाहिले. त्यांना काही तरी हलताना दिसले.
त्यावेळी पाण्याखाली एक मुलगा आढळून आला. त्यानंतर गावकऱ्यांनी पाण्यात शोधाशोध केली. त्यावेळी त्यांना दुसऱ्या मुलाचा मृतदेह दिसून आला. त्यांच्या घरातल्यांना ही बाब समजल्यानंतर कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलांच्या आई-वडिलांच्या पायाखालून जणू जमीनच घसरली. संपूर्ण घटनेची माहिती रामटेक पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मुलांच्या शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कारासाठी दोन्ही मुलांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना दिले आहेत.