
Ladki Bhahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी विशेष मोहिम राबवली गेली. महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून यासाठी माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे. यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचा दावा सरकारने केला आहे. काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत, असं महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) July 26, 2025
या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्यात आला आहे. अशी माहिती ही या निमित्ताने आदिती तटकरे यांनी दिला आहे. तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून, त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल असं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. शिवाय या योजनेचा जवळपास 14 हजार पेक्षा जास्त पुरूषांनी लाभ घेतल्याचा दावा सुळे यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे शासन स्तरावर खळबळ उडाली आहे. शिवाय आदिती यांच्या या ट्वीटमुळे त्यात तथ्य असल्याचं ही स्पष्ट झालं आहे.
या योजनेच्या माध्यामातून जवळपास 21 कोटी रूपये पुरूषांनी आपल्या खिशात घातले आहेत. महिलांच्या नावाने पुरूषांनी अर्ज भरल्याचेही समोर आले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या नावाने ज्यांनी पैसे हडप केले आहेत त्यांच्याकडून ते पैसे वसूल केले जातील, असं अजित पवार म्हणाले. यात जर कुणी सहकार्य केलं नाही तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता तब्बल 26.34 लाख लाभार्थी लाडक्या बहिणींना दणका बसला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world