पुण्यातून अल्पवयीन मुलीला पळवलं..पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी इन्स्टाग्रामच्या एका 'क्लू'मुळे सापडला!

पुणे जिल्ह्यातून अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या 22 वर्षीय आरोपीला नागपूर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडलं आहे. वाचा इनसाइड स्टोरी..

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Minor Girl Abduction Case
पुणे:

संजय तिवारी, प्रतिनिधी

Crime News Today : पुणे जिल्ह्यातून अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या 22 वर्षीय आरोपीला नागपूर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून क्लू मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि बेपत्ता झालेल्या 15 वर्षीय मुलीचा शोध लावला. नागपूर पोलिसांच्या परिमंडळ क्रमांक 05 अंतर्गत पोलीस ठाणे वाठोडाच्या टीमला या आरोपीला पकडण्यात यश आलंय. मयूर रमेश वघरे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तो गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव येथील रहिवासी आहे. न्यायालयाने आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. नागपूर पोलिसांच्या परिमंडळ क्रमांक 05 चे उपायुक्त निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

वर्धा,गोंदिया आणि नागपूर ग्रामीण भागातही मुलीचा शोध घेतला पण..

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर पोलिसांनी 4 महिन्यांपासून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावला. ती सुखरूप असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मयूर वघरेला अटक केली.गेल्या वर्षी 28 सप्टेंबर रोजी 15 वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या बेपत्ता मुलीचा शोध वर्धा,गोंदिया आणि नागपूर ग्रामीण या भागात घेण्यात आला होता. या मुलील पळवून नेणारा आरोपी मयूर हा वाय-फायच्या माध्यमातून इंस्टाग्रामचा वापर करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

आरोपीने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली अन्..

आरोपीने तीन दिवसांपूर्वी त्याच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली होती. त्यानंतर संबंधित आरोपीच्या मित्राचा पोलिसांनी शोध घेतला आणि त्याला आरोपीला संपर्क करण्यासाठी सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांचे पथक पुण्यातही रवाना झाले होते. पोलिसांनी एका महिला पोलिसाला आरोपीच्या मित्राच्या मैत्रिणीची भूमिका साकारण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आरोपीला पुणे बसस्थानकात 12 तास वाट पाहायला लावली. त्यानंतर आरोपीला बारामती येथे येण्यास सांगितले. तिथे तो 6 तास थांबला आणि आरोपीला अखेर भवानीनगर बस स्टॉप इंदापूर येथे बोलावले.आरोपीची इंस्टाग्राम व्हिडिओ कॉल करून खात्री केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला भवानीनगर येथे अटक केली.