Nagpur Violence : 17 मार्चची सायंकाळ नागपुरकरांसाठी एक मोठं संकट घेऊन आली. आतापर्यंत सर्व समाजाचे लोक एकोप्याने राहणाऱ्या नागपुरात दंगल उसळली. या दंगलीनंतर महाराष्ट्रभरातून संतापाच्या प्रतिक्रिया येत आहे. या दंगलीमध्ये 33 पोलीस अधिकारी आणि तीन उपायुक्त दर्जाचे अधिकारी जखमी झाले आहेत. दंगलखोर सर्वसामान्यांच्या घरात शिरल्याचंही सांगितलं जात आहे. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव नागपुरातील काही भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आज अधिवेशनात नागपूर दंगलीवरुन गोंधळ पाहायला मिळाला. अशा प्रकारे दंगल उसळणे ही सत्ताधाऱ्यांची नामुष्की असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. नागपूर दंगलीबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी दोन ट्रॉली भरून दगड सापडले आहेत. याशिवाय अनेक शस्त्रंही सापडल्याचं त्यांनी सांगितलं.
नक्की वाचा - Nagpur Violence : नागपूर दंगल रोखता आली असती का? पोलिसांचं नेमकं काय चुकलं?
आयुक्तांनी सांगितल्यानुसार, नागपुरात तहसिल आणि गणेशपेठ या भागात आणि आजूबाजूच्या पाच किलोमीटर अंतरावर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या परिसरातील 11 पोलीस ठाण्यात कर्फ्यू लावण्यात आले आहेत. आतापर्यंत पाच एफआयआर दाखल करण्यात आले असून 50 हून जास्त अटक करण्यात आले आहे. या दंगलीत 34 पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. दोन उपायुक्त दर्जाचे पोलीस अधिकारी रुग्णालयात दाखल असल्याचं आयुक्त म्हणाले. सोशल मीडियावर कोणतंही वक्तव्य करताना अधिक सजगतेने करावं. दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असंही ते यावेळी म्हणाले.