योगेश लाटकर
सक्षम ताटेच्या हत्येने संपूर्ण राज्य हादरून गेलं. पण ज्या वेळी सक्षमची प्रेयसी आंचलने त्याच्या मृतदेहा सोबतच लग्न केलं त्यावेळी सगळेच हळहळले. एक प्रेम कहाणी घरच्यांच्या विरोधामुळे अधुरी राहीली. नांदेडमध्ये झालेली ही हत्या सर्वांना पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडणारी आहे. सक्षमच्या हत्येनंतर त्याचे गुन्हेदार ही आता गजाआड आहे. विशेष म्हणजे ते सर्व जण आंचलचेच सख्ख्या रक्ताचे आहेत. सक्षमची हत्या होण्या आधी काय काय घडलं याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. ही माहिती स्वत: आंचलनेच NDTV मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत धक्कादायक खुलासे केले आहे. ते ऐकले तर तुमचे मन सुन्न झाल्या शिवाय राहाणार नाही. सक्षम ताटे आणि आंचल मामिडवार यांच्यात प्रेम संबंध होते. याची माहिती आंचलच्या भावाला मिळाली होती. तिचा भावा हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. तो जेलमध्ये ही जावून आला आहे. बहिणीचं प्रेम प्रकरण समजल्यानंतर त्याने सक्षम बरोबर मैत्री केल्याचं आंचलने सांगितलं. पुढे ती सांगते की माझ्या भावाने जरी सक्षम सोबत मैत्री केली असली तरी तो कधी तरी त्याचा बदला घेणार असं मला वाटत होतं असं ती म्हणाली. तो सक्षमला काही बोलायचा नाही. पण माझ्या समोर मी त्याला ठार मारणार असं वारंवार सांगायचा. सक्षमची हत्या झाली त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता. त्या दिवशी आपला भाऊ त्याच्या सोबत काही तरी करेल अशी भीत आपल्याला होती. त्यामुळे त्याला शहरात राहू नको असं सांगितलं होतं असं ही तिने सांगितलं.
सक्षमचा बर्थडे म्हटल्यावर माझा भाऊ तिथं जाणार. त्यामुले तो केकमधून काही तरी घालून त्याला मारतील असं मला वाटत होतं असं ही तिने बोलून दाखवलं. पण आपल्या भावाने त्याचा विश्वास जिंकला होता. त्यामुळे सक्षम ही त्याच्यावर विश्वास ठेवत होता. पण माझा माझ्या बापावर आणि भावावर कधीच भरोसा नव्हता. शेवटी तेच खरं ठरलं. ज्या दिवशी सक्षमचा खून करण्यात आला त्या दिवशी सकाळी सव्वा अकरा वाजता माझा लहान भाऊ मला पोलीस स्टेशनमध्ये घेवून गेला होता. तिथे त्याने मला सक्षम विरोधात तक्रार कर अशी जबरदस्ती केली. पण मी त्याच्या विरोधात काही तक्रार करणार नाही असं स्पष्ट सांगितलं. हे सर्व पोलीसांसमोर सुरू होतं असं ही ती म्हणाली.
नक्की वाचा - माझा प्रियकर मरूनही जिंकला! मृतदेहाशी केले तरूणीने लग्न; नांदेडमधली 'सैराट' घटना
त्याच वेळी तिथे असलेल्या पोलीसांनी आपल्या छोट्या भावाला उकसवलं. ते म्हणाले अशी तक्रार काय करतोस, 'तुझ्या बहिणीचं ज्याच्या सोबत लफडं आहे त्याला मारून ये मग तक्रार दे' अशा शब्दात पोलीस त्यावेळी म्हणाल्याचा दावा आंचलने या मुलाखतीत केला आहे. त्यावर माझा लहान भाऊ पोलीसांना म्हणाला आज रात्री त्याला ठार मारतो आणि मगच तक्रार द्यायला स्वत: येतो असं सांगून तो तिथून निघून गेला असं आंचलने सांगितलं. त्यावेळी असं काही मोठं होईल याची मला काहीच कल्पना नव्हती. त्याचा विचार ही केला नाही. सक्षमची हत्या झाली आहे हे ही आपल्याला माहित नव्हतं. त्याची हत्या झाली त्याच वेळी घरचे म्हणाले चला आपण देवदर्शनाला जायचं आहे. त्यांनी सांगितल्या प्रमाणे मी ही त्यांच्या सोबत देवदर्शनासाठी निघाल्याचं आंचलने सांगितलं.
नक्की वाचा - Pune News: 5 डिसेंबरला राज्यातल्या शाळा बंद राहणार, शाळा बंद ठेवण्याचं कारण काय?
त्यानंतर शंका आली म्हणून अचानक देवदर्शनाला का असा प्रश्न विचारला. त्यावर सक्षम आणि माझा मोठा भाऊ हिमेशची भांडणं झाली आहेत असं मला सांगण्यात आल्याचं आचंल म्हणाली. या भांडणामध्ये सक्षमला मार लागला आहे. त्याला टाके पडले आहेत असं सांगितलं. त्यावर मी खूप रडले. पण सक्षमला जास्त काही झालं नाही म्हणून मी शांत बसले. रात्री दिड वाजता आम्ही आईच्या घरी पोहोचलो. तो पर्यंतही सक्षमचा खून झाला आहे याची कल्पना आपल्याला नव्हती. तिथे गेल्यानंतर आपला मोठा भाऊ आणि वडील तिथेच होते. त्यावेळी ते त्याचा खून करून तिथे लपण्यासाठी आले होते. पण याची कल्पना आपल्याला नव्हती. आईच्या घरी पोहोचल्यानंतर काही वेळात पोलीस तिथे आले. त्यांनी आपल्या वडील, भाऊ आणि आईला अटक केली. छोट्या भावाला तर घटनास्थळीच अटक करण्यात आली होती.
सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. तोपर्यंतही आपल्याला काय झाले याची कल्पना नव्हती. वडील, भाऊ यांना पोलीसांनी हातकड्या घातल्या होत्या. रात्री काही तरी घडलं आहे असं मन खात होतं. पण काय नक्की झालं आहे हे समजत नव्हतं. सकाळी पोलीस स्टेशनमध्ये एक पेपर आला होता. त्या पेपरमध्ये सक्षमचा फोटो होता. त्यात सक्षमचा खून झाला आहे हे होतं. त्यावेळी सक्षम आता राहीला नाही हे समजले. त्याच वेळी आपल्या पायाखालची वाळू सरकली. आपल्या सोबत घात झाला होता. घात करणारे आपलेच होते असं ती म्हणाली. क्षणात सर्व काही संपलं होतं. तिन वर्षापासून आम्ही एकत्र होतो. आम्ही दोघांनी खूप सारी स्वप्न पाहीली होती. लग्न करायचं ही ठरवलं होतं. सर्व काही ठिक होईल आणि आपण आनंदाने राहू हे आम्ही ही ठरवलं होतं. पण माझ्या भाव, आई बापाने सर्व स्वप्न तोडली. क्षणात सर्व काही संपलं होतं. मी पूर्ण पणे तुटली होती. घात झाला होता. सक्षमचं कुटुंब तर उघड्यावर पडलं होतं.
सक्षम हा ही गुन्हेगार होता हा आरोप ही आंचलने फेटाळून लावला आहे. माझे वडील आणि भाऊच गुन्हेगार होते. ते जेलमध्ये ही जावून आले होते. काही पोलीस ही त्यांच्या ओळखीचे आहेत. त्यांना पैसे देवून त्यांनी सक्षमवर खोटे गुन्हे दाखल केले होते असा दावा ही आंचलने केला आहे. माझ्या वडीलांवर प्रेम होते. पण तेवढेच प्रेम हे सक्षमवर ही होते. ते असं काही करतील असं वाटलं नव्हतं. पण त्यांनी जे काही आता केलं आहे त्यामुळे ते माझ्या मनातून उतरले आहेत. सक्षमने आपल्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप करण्यात आला होता. पण त्याने असे कधीच केले नाही असं ही ती म्हणाली. ते सर्व आपल्या भावाच्या मित्रानेच पसरवलं होतं. आता माझ्या घरातले वडील, आई, दोन भाऊ जेलमध्ये आहेत. त्यांना कडक शिक्षा झाली पाहीजे. ते कधीच बाहेर आले नाही पाहीजे. ते सर्व जण मेले पाहीजे. त्यांना फाशी द्या. विषय संपला असं सांगत ती भाऊक झाली. या पुढे आपण सक्षमच्याच घरी राहाणार आहे. त्याच्या आईवडीलांना आधार देणार आहे. त्यांचा मुलगा आता राहीला नाही पण आपण त्यांचा मुलगा बनून त्यांना आधार देणार आहे. ते मला शिकवत आहेत. मी शिकून मोठी अधिकारी होणार त्यांना त्यांच्या मुलाची कमी कधीच भासू देणार नाही असं ही तिने स्पष्ट केलं.