योगेश लाठकर
एका घरात लग्नाची वरात येण्याची जोरदार तयारी सुरू होती. त्यासाठी विवाहाचा मंडप टाकण्याचे काम सुरू होते. पण दुर्दैवाने जिथे लग्नाची वरात येणार होती त्याच ठिकाणाहून दोघांची अंत्ययात्रा निघाल्याची घटना घडली आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात असलेल्या बोरगाव येथे घडली आहे. 19 एप्रिल रोजी मध्यरात्री एक वाजता ही घटना घडली. यामुळे सर्वच जण हादरून गेले आहेत. शिवाय सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हदगाव तालुक्यातील बोरगाव येथे एका कुटुंबात विवाह सोहळा होता. या विवाह सोहळ्यासाठी लग्नाचा मंडप टाकण्याचे काम सुरू होते. लग्न घरात साईनाथ भट्टेवाड आणि पांडुरंग भट्टेवाड या दोघांसह राजू भट्टेवाड हा लग्न मंडप टाकण्याचे काम करत होता. साईनाथ आणि पांडुरंग वरील भागात काम करत होते. यावेळी अचानक सोसाट्याचा वारा सुटला. त्यामुळे मंडप अस्ताव्यस्त होत होता. एवढ्यात साईनाथ आणि पांडुरंग बाजूला असलेल्या विजेच्या तारांना चिटकले.
त्यामुळे शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर शिवप्रसाद भट्टेवाड याचा पाय फ्रॅक्चर झाला . आनंद सोहळ्याच्या ठिकाणी दुःखद घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मयत साईनाथ आनंदराव भट्टेवाड याचे वय 22 वर्षे होते. त्याच्या पश्चात आई-वडील आणि दोन भावंड आहेत. तर मृत पांडुरंग भट्टेवाड याचे वय 22 वर्ष असून त्याच्या पश्चात आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे.
लग्न घरातच अशी घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. एकीकडे लग्नाची तयारी जोरात सुरू असताना अशी घटना घडली. साईनाथ भट्टेवाड आणि पांडुरंग भट्टेवाड यांनी लग्ना घरातल्या मंडपाचे काम घेतले होते. त्यावेळी हा अनर्थ घडला. गावात प्रकाश रावजी शिंदे यांच्या मुलीचा विवाह सोहळा होता. त्यासाठी मंडप टाकणं सुरू होत. आज हा विवाह गावातील अन्य जागेवर अत्यंत सध्या पद्धतीने संपन्न झाला.