निलेश वाघ, नाशिक: नाशिकच्या येवल्यामधील कोळमच्या आवारे वस्तीवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील महिला व पुरुषांना दरोडेखोरांकडून जबरी मारहाण करण्यात आली असून अंगावरील सोन्यांच्या दागिन्यांसह घरातील 50 हजार रुपये लंपास करण्यात आले आहेत. या हल्ल्यातील जखमींवर येवल्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या येवला तालुक्यातील कोळम येथील आवरे वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास 4 ते 5 अज्ञात दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून घरातील महिलांना मारहाण करत त्यांच्या अंगावरील सोने , चांदीचे दागिने व कपाटातील 50 हजार रुपये रोकड चोरून नेली. उकाड्यामुळे आवारे कुटुंबाततील पुरुष घराबाहेरील ओट्यावर झोपलेले असताना चाकूचा धाक दाखवून दरवाजा खोलण्यास भाग पाडण्यात आले.
यानंतर दरोडेखोरांनी घरात झोपलेल्या चार वर्षाच्या चिमुरडीच्या गळ्यावर चाकू लावून महिलांना मारहाण करत ही जबरी लूट केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिसांनी तात्काळ या दरोडेखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
नक्की वाचा - Badlapur News : बदलापूरकरांच्या डोक्याला 'ताप'; रेल्वेच्या तिकीट खिडकीमुळे मनस्ताप
दुसरीकडे पुणे विमानतळावर एका व्यापाऱ्याला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुबईहून पुण्याला स्पाइस जेट कंपनीच्या विमानातून येणाऱ्या एका व्यवसायिकाच्या सामानातून दीड लाखाची रोकड चोरल्याचा प्रकार पुणे विमानतळावर उघडकीस आला आहे. या प्रकरणानंतर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापूर्वी देखील असे चोरीचे प्रकार घडले आहेत. याबाबत फिर्यादी यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे पर्यटन व्यवसायिक आहेत आणि कामाच्या निमित्ताने 28 एप्रिलला दुबई येथे गेले होते. काम संपवून स्पाइस जेट कंपनीच्या विमानाने गुरुवारी मध्यरात्री पुण्यासाठी निघाले त्यावेळी लॉक असलेली बॅग विमान कंपनीच्या कर्मचाऱ्याकडे दिली त्यामध्ये दीड लाख रोकड होती. पुणे विमानतळावर पहाटे सव्वाचार वाजता उतरले तेव्हा सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सामान घेण्यासाठी बॅग घेतली असता तिचे लॉक तुटलेले दिसले त्यावेळी त्यातील रक्कम गायब होती.