Nashik Crime : डुक्करांना त्रास म्हणून कुत्रे-मांजरींना विष देऊन संपवलं; संतापजनक कृत्य

या घटनेत 20 पेक्षा जास्त भटके श्वान आणि काही मांजरी ठार झाल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nashik Crime News Killed Dog : कुत्र्यांना विष देऊन ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या सटाणा तालुक्यातील अंबासन गावात समोर आला. या घटनेत 20 पेक्षा जास्त भटके श्वान आणि काही मांजरी ठार झाल्या आहेत. डुक्कर पालकाने आपल्या डुक्करांचे रक्षण करण्यासाठी शांत डोक्याने हे क्रूर कृत्य केलं. त्यामुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

अंबासन परिसरात डुक्करांची संख्या मोठी आहे. हे मोकाट डुक्करे गावात इकडून तिकड हुंदडून पिकांचे नुकसान करीत असल्याने ग्रामस्थ व शेतकरी हैराण असतात. डुक्करांना कुत्र्याचा त्रास होऊ नये यासाठी डुक्कर मालकाने कुत्र्यांना विषारी औषध टाकले. यात कुत्रे आणि मांजरे मृत्यूमुखी पडले. गावात दुर्गंधी पसरल्याने हा सर्व प्रकार समोर आला. या घटनेत 20 पेक्षा अधिक कुत्रे तर काही मांजरी ठार झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली. विशेष म्हणजे गावातील मुख्य चौकात आणि अंगणवाडीजवळ हे विषारी औषधे टाकले होते. एखाद्या लहान मुलांनी ते औषध खाल्ले असते तर मोठा अनर्थ घडला असता. या घटनेमुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली असून प्राण्यांची निर्दयीपणे हत्या करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

नक्की वाचा - Thane Crime: शेतात खड्डा, त्यात दोघींचे मृतदेह... भयावह घटनेने ठाणे हादरलं

विषारी औषधं सेवन केल्याने काही लेकुरवाळी मादी दगावल्याने पिल्ले पोरकी झाली आहे. काही प्राणीप्रेमी या पिलांचा सांभाळ करीत आहे. दरम्यान या घटनेनंतर डुक्कर मालक सुरेश शामराव शिंदे आणि त्याचा मुलगा अंबादास सुरेश शिंदे या संशयितांना जायखेडा पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२५ अन्वये गुन्हा क्र. ३११/२०२५ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. तर ग्रामपंचायत प्रशासनानेही या प्रकाराची गंभीर दखल घेत 7 दिवसांत डुक्करांची विल्हेवाट लावावी असा अल्टिमेटम दिला आहे. स्वत:च्या फायद्यासाठी मुक्या जीवांचा बळी घेणाऱ्या डुक्कर मालकांविरुद्ध संताप व्यक्त होत असून मुक्या जीवांचा बळी घेणारा विकृत मानसिकतेला आता कायद्याने धडा शिकविण्याची गरज आहे. 

Topics mentioned in this article