प्रांजल कुलकर्णी, नाशिक: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारी घटनांनी कळस गाठला आहे. हत्या, मारामारी, अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. एकीकडे पुण्यातील पत्नीने पतीला संपवल्याची घटना ताजी असतानाच आता नाशिकच्या सिन्नरमधून एक भयंकर घटना समोर आली असून पतीने पत्नी अन् सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवऱ्याने बायको आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनारी येथे घडली आहे. केदार हंडोरे असे आरोपीचे नाव असून या घटनेत पत्नी स्नेहल शिंदे आणि सासू अनिता शिंदे गंभीर जखमी झाल्यात. या घटनेत आरोपीने आधी स्वतः ला पेटवून घेतल्याने तो सुद्धा यात गंभीर जखमी झाला.
आरोपी मध्यरात्री घरात घुसला अन् त्याने ज्वलनशील पदार्थ टाकत घर पेटवून दिले. यामध्ये आरोपी पती, बायको आणि सासू तिघेही गंभीर जखमी झालेत. पतीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू तर बायको आणि सासूवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
(नक्की वाचा- Shirdi News : फाड-फाड इंग्रजी, डोळ्यात पाणी; शिर्डीत भीक मागताना सापडला ISRO चा अधिकारी)
धक्कादायक बाब म्हणजे नवऱ्याने स्वतः पेटवून घेत आमच्या अंगावर येऊन झोपल्याचा खुलासा आरोपीची पत्नी स्नेहल शिंदेने केला आहे. दरम्यान, या भयंकर घटनेत स्नेहल शिंदे 50 टक्के तर सासू अनिता शिंदे 65 टक्के भाजली आहे. घटनेतील तिघांचीही प्रकृती गंभीर असून सध्या तिघांवरही उपचार सुरु आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.