जाहिरात

Ashok Kharat: भोंदू कॅप्टनच्या पापात पत्नीही भागीदार? पाडळीच्या 'सुनीता'चा 'कल्पना'होण्याचा धक्कादायक प्रवास

Ashok Kharat Wife: नाशिकच्या आलिशान बंगल्यात राणीसारखं आयुष्य जगणारी ही महिला नेमकी कोण आणि तिचा गुन्हेगारी साम्राज्यात नेमका किती सहभाग आहे? याचा पोलीस शोध घेत आहेत.

Ashok Kharat: भोंदू कॅप्टनच्या पापात पत्नीही भागीदार? पाडळीच्या 'सुनीता'चा 'कल्पना'होण्याचा धक्कादायक प्रवास
Ashok Kharat Wife: अशोक खरात आणि कल्पना यांचा विवाह एका नातेवाइकामार्फत जुळवण्यात आला होता.
मुंबई:

Ashok Kharat Wife: नाशिकचा भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणात रोज नवे धक्कादायक गौप्यस्फोट होत आहेत. या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे, याचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत. खरातच्या काळ्या धंद्यांचा तपास सुरु असतानाच त्याची पत्नी कल्पना खरात हिचं नाव आता समोर आलं आहे. नाशिकच्या आलिशान बंगल्यात राणीसारखं आयुष्य जगणारी ही महिला नेमकी कोण आणि तिचा गुन्हेगारी साम्राज्यात नेमका किती सहभाग आहे, या प्रश्नांनी सध्या तपास यंत्रणांना चक्रावून सोडलं आहे. विशेष म्हणजे, ज्या वेळी पोलीस पथक तिच्या घरात शिरलं, त्यापूर्वीच ती पसार झाली असून आता पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत. 

काय आहे कल्पना खरातचा इतिहास?

कल्पना खरात हिचा प्रवास एका साध्या ग्रामीण कुटुंबातून सुरू होऊन थेट करोडोंच्या फसवणुकीच्या जाळ्यात येऊन थांबला आहे. सिन्नर तालुक्यातील पाडळी हे तिचं मूळ गाव. तिथे तिचं माहेर असून तिचं जुनं नाव सुनीता होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कल्पना एका बाजूला नाशिकच्या 'तृप्तबाला' बंगल्यात ऐशोआरामी जीवन जगत होती, मात्र तिच्या माहेरची परिस्थिती आजही अत्यंत हलाखीची आहे.

 तिच्या कुटुंबावर गेल्या काही वर्षांत संकटांची मालिका कोसळली; मोठ्या भावाचा अपघातात मृत्यू झाला आणि वडिलांचंही आजारपणामुळे निधन झालं. सध्या तिच्या माहेरी वृद्ध आई आणि विधवा भावजय अत्यंत कष्टाने दिवस काढत आहेत.

( नक्की वाचा : Ashok Kharat : खरातच्या बंगल्यात एसआयटीची थरारक एन्ट्री! पत्नी फरार, मुलाला या पद्धतीनं पोलिसांनी उचललं )
 

कसं झालं होतं लग्न?

अशोक खरात आणि कल्पना यांचा विवाह एका नातेवाइकामार्फत जुळवण्यात आला होता. वयामध्ये मोठं अंतर असूनही केवळ खरात कुटुंबाने लग्नाचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दाखवली, म्हणून हे लग्न झाल्याचं बोललं जातं.

लग्नानंतर कल्पनाचं आयुष्य पूर्णपणे पालटलं. ती या नव्या श्रीमंतीत इतकी रमली की तिचं माहेराशी असणारं नातं हळूहळू तुटत गेलं. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ती क्वचितच आपल्या गावी येत असे. तिचे दोन भाऊ असून, त्यातील एक सिन्नर-शिर्डी महामार्गावर हार्डवेअरचं दुकान चालवतो, तर दुसरा नाशिकमध्ये वास्तव्यास आहे.

( नक्की वाचा : Ashok Kharat: धक्कादायक! मंत्रिमंडळ निवडीतही खरातची लुडबुड? अजित पवारांच्या दरबारात थेट पोहोचला होता निरोप )

शिर्डीतील एका जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातसोबतच कल्पनावरही गुन्हा दाखल झाला आहे. एसआयटीने जेव्हा खरातच्या घरावर छापा टाकला, तेव्हा तिचा मुलगा हर्षवर्धन पोलिसांच्या हाती लागला, मात्र कल्पनाने तिथून आधीच पळ काढला. सध्या पोलिसांचं एक पथक तिच्या शोधासाठी पुण्याच्या दिशेने रवाना झालं आहे. ही महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानंतर या भोंदू कॅप्टनच्या अनेक गुप्त व्यवहारांचा आणि फसवणुकीच्या नव्या पद्धतींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com