नवी मुंबई: "तुमचा कुत्रा माझ्या घरासमोर घाण करतो, नाही थांबवला तर तुला मारून टाकीन!" अशी धमकी देत एका संतप्त शेजाऱ्याने २५ वर्षीय नर्स तरुणीला घरात घुसून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना ऐरोलीतील जुना चिंचपाडा परिसरात घडली. या प्रकारामुळे महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रबाळे MIDC पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पीडित महिला निशा वाघेला (25) या ऐरोलीतील आदिवासी पाडा, जुना चिंचपाडा परिसरात मोठ्या बहिणीसह राहत असून त्या पुण्यात एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत आहेत. वाघेला कुटुंबात कमावते एकमेव व्यक्ती असल्याने संपूर्ण घराचा उदरनिर्वाह निशाच सांभाळते. शुक्रवार, 20 जून रोजी पहाटे साडेसहाच्या सुमारास, निशा घरात लादी पुसत होती. त्याचवेळी तिचा शेजारी मनोज नावाचा इसम तिच्या दारासमोर येऊन तिच्या कुत्र्याबाबत आक्षेप घेत म्हणाला, "तुम्हारा कुत्ता मेरे घर के सामने गंदगी करता है, उसको संभालो नही तो तुमको मैं मार डालूंगा."
निशाने शांतपणे उत्तर देत, "मी साफ करते, अशा रागाने नको बोलूस," असे म्हटले आणि ती घरात जाऊ लागली. मात्र, संतापलेल्या मनोजने पाठीमागून तिच्या डोक्यावर हातातल्या दगडाने जोरदार मारहाण केली. त्यानंतर त्याने तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जमिनीवर लोळवले आणि नंतर तिला उचलून थेट घराबाहेर फेकून दिले. निशाच्या किंकाळ्या ऐकून शेजारी लोक धावत आले. गर्दी वाढताच आरोपी मनोजने तेथून पळ काढला. त्यावेळी निशाची मोठी बहीण अंजु वाघेला औषध आणायला बाहेर गेली होती. तिला घटनेची माहिती मिळाल्यानंतर ती घरी परत आली, तेव्हा निशा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. डोक्यावरून व डोळ्याजवळून रक्त वाहत होते.
Beed Crime: बीडमध्ये चाललंय काय? झाड तोडण्यास विरोध केला म्हणून महिलेसह कुटुंबावर प्राणघातक हल्ला
तत्काळ रबाळे MIDC पोलीस ठाण्यात दाखल होऊन अंजु व निशा यांनी आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पोलीसांनी संबंधित इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. गंभीर जखमी झालेल्या निशा वाघेलांना उपचारासाठी वाशी येथील महापालिका रुग्णालयात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार तर करण्यात आले, मात्र बेड उपलब्ध नसल्यामुळे निशाला दाखल करता आले नाही. त्यामुळे सध्या तिच्यावर ऐरोलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोक्याला आणि डोळ्याजवळील मारामुळे तिच्या दृष्टिला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पीडितेवर संपूर्ण कुटुंब अवलंबून
वाघेला कुटुंबात कर्ताधर्ता पुरुष नसल्याने निशा हीच कुटुंबाचा आधार आहे. तिच्या नोकरीतूनच आई, बहिण आणि भाच्यांचा सांभाळ केला जातो. अशी महिला जी इतरांना सेवा देते, तिच्यावरच अशा पद्धतीचा प्राणघातक हल्ला होतो, यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेने महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. केवळ पाळीव श्वानामुळे घरात घुसून एखाद्या महिलेला अशा पद्धतीने मारहाण होणे, हे समाजातील वाढत्या असंवेदनशीलतेचं लक्षण आहे. परिसरातील अनेक नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करत निषेध व्यक्त केला आहे.
नक्की वाचा - Beed Crime: तुला नीट वापस जायचं आहे का? डांबून ठेवत एकाला बेदम मारहाण; बीडमधील वारकरी सांप्रदायाच्या शाळेतील प्रकार
श्वानप्रेमी संस्था आणि महिला संघटनांनी यामागे समाजातील विकृत मानसिकतेचा पगडा असल्याचे सांगत, यासंदर्भात आवाज उठवण्याची गरज व्यक्त केली आहे. "प्रेमाने प्राणी सांभाळणाऱ्या कुटुंबावर असा हल्ला होतो, आणि आरोपी अजूनही मोकाट आहे, हे व्यवस्थेचं अपयश आहे," अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. नवी मुंबई रबाळे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी या घटनेची गंभीर दखल घेत तपास करत आहेत. आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी निशा वाघेलांच्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.