नवी मुंबई: खारघरमधील एका प्रतिष्ठित गृहनिर्माण सोसायटीत आयआरएस (भारतीय महसूल सेवा) अधिकाऱ्याच्या कथित दादागिरीमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. संबंधित अधिकाऱ्याने त्यांच्या फ्लॅटच्या बाहेर बेकायदेशीर बांधकाम करण्याचा प्रयत्न करताच, सोसायटीच्या सदस्यांनी याला विरोध दर्शवला. मात्र, या विरोधाला दबवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने बाहेरून काही अनोळखी महिलांना बोलावून धमक्या दिल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून तो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
(नक्की वाचा : मद्यधुंद गुंडाचा हैदोस, तरुणावर प्राणघातक हल्ला, प्रकृती चिंताजनक)
काय आहे प्रकरण?
घटना खारघर सेक्टरमधील एका नावाजलेल्या सोसायटीतील आहे. या सोसायटीत राहणाऱ्या आयआरएस अधिकाऱ्याने त्यांच्या फ्लॅटच्या बाहेर कथित अतिक्रमणाचे काम सुरू केले होते. स्थानिक रहिवाशांनी आणि सोसायटी पदाधिकाऱ्यांनी त्याला विरोध केला असता, त्यांनी वाद घालत बाहेरून काही महिलांना सोसायटीत बोलावले. या महिलांनी येताच सोसायटीच्या सदस्यांना शिवीगाळ करत धमकावणे सुरू केले. या महिलांचे वर्तन आक्रमक होते, आणि त्यांनी खुलेआम गैरवर्तन केले, असेही रहिवाशांचे म्हणणे आहे. या साऱ्या प्रकारात संबंधित अधिकारी मूकदर्शक राहिले, ज्यामुळे त्यांनीच हे सगळं घडवून आणले असा संशय उपस्थित केला जात आहे.
व्हिडिओ व्हायरल, रहिवाशांचा आक्रोश
संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोसायटीच्या सीसीटीव्हीत कैद झाला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये महिलांचा आक्रस्ताळा प्रकार, शिवीगाळ आणि धमक्यांचे दृश्य स्पष्टपणे दिसते. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे. घटनेनंतर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी खारघर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये अतिक्रमण, धमकी देणे, शांतता भंग करणे आणि सोसायटीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा उल्लेख आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. संबंधित व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब गोळा करण्यात येत आहेत.
Akola News : हॉर्नमुळे एकाचा जीव गेला, अकोल्यातील धक्कादायक घटना
सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
"जर सरकारी अधिकारीच कायद्याचे उल्लंघन करणार असतील, तर मग न्याय कुणाकडे मागायचा? आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला आहे. आम्ही हे सहन करणार नाही, याविरोधात आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देणार आहोत, असं सोसायटी सचिवांनी म्हटलं आहे. रहिवाशांनी प्रशासनाकडे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे की, संबंधित अधिकाऱ्याविरोधात सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जावी. सरकारी पदाचा वापर करून समाजात दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींना पाठीशी घालू नये, अशी भूमिका सोसायटीने मांडली आहे.