प्रथमेश गडकरी
विवाहवाह्य संबधातून एका माजी पोलीसाला हाताशी धरुन एका पत्नीनं आपल्याच पती विरोधात भयंक पाऊल उचललं आहे. ही घटना नवी मुंबईतील उलवे इथं घडली आहे. या प्रकरणी पत्नी, तिचा प्रियकर असलेला माजी पोलीस कर्मचारी, एक रिक्षा चालक आणि आरोपी महिलेचा अल्पवयीन मुलग्याला ही अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तिने आपला पती गायब झाल्याचा बनाव ही केला होता. पण ज्यावेळी पोलीस तपास पुढे सरकला त्यावेळी तिचा पर्दाफाश झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रेश्मा मोरे वय 35 वर्ष ही आपला पती सचिन मोरे याच्या बरोबर नवी मुंबईतल्या उलवे या ठिकाणी राहात होते. या दोघांमध्ये नेहमी भांडण होत होती. रेश्माने पतीकडे घटस्फोट मागितला होता. पण तो देण्यास तयार नव्हते. तर दुसरीकडे रेश्माचे टाके रोहित टेमकर याच्याबरोबर जुळले होते. रोहित हा मुंबई पोलीसात कामाला होता. पण त्याला त्याच्या वर्तवणूकीमुळे पोलीस दलातून काढून टाकण्यात आले होते. ते दोघे एका स्टोअरमध्ये कामाला होते. तिथेच या दोघांचे प्रेम जुळले. पण या दोघांमध्ये रेश्माचा पती होता. त्याचा काटा काढण्याचा या दोघांनीही कट रचला.
त्यानुसार रोहितने रेश्माला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्या गोळ्या तिने ज्यूसमध्ये टाकून पती सचिनला दिल्या. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. पुढे प्रथमेश म्हात्रे याची रिक्षा बोलावण्यात आली. हा प्रथमेश आणि रोहित हे मित्र होते. त्या रिक्षात सचिनला टाकण्यात आले. त्यावेळी रेश्माने सचिनचा गळा ओढणीने आवळला. पण तरीही सचिन जिवंत होता. म्हणून तिने त्याचे तोंड आणि गळा परत आवळला. नंतर त्याचा मृतदेह वहाळ खाडी पुलाजवळ फेकून दिला होता. विशेष म्हणजे यावेळी तिचा अल्पवयीन मुलगा ही तिच्या बरोबर होता.
त्यानंतर पत्नी रेश्मा हीने पोलिसात सचिन बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. पण ज्यावेळी सचिनचा शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला त्यावेळी त्याचा खून झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात रेश्मा ही सतत रोहित याच्या टचमध्ये होती. शिवाय ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी रोहित ने आपला फोनही स्विच ऑफ केला होता. शिवाय सीसीटीव्ही कॅमेरेही पोलिसांनी चेक केले. त्यात हे आरोपी रिक्षात एकत्र दिसले होते. सर्व पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी आधी रेश्मा आणि तिला मदत करणाऱ्या रिक्षा चालक प्रथमेश म्हात्रे याला अटक केली. त्यानंतर सिंधुदुर्गातून रोहित यालाही पोलिसांनी अटक केली आहे.