Navi Mumbai News: नवी मुंबईकर दहशतखाली, दिवसाही घर बंद करून जगतायेत स्थानिक; नागरिकांनो सतर्क राहा

Navi Mumbai News: नवी मुंबईकरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालंय. लोकांना दिवसा देखील घराबाहेर पडणं कठीण ठरतंय. इतकी भीती का निर्माण झालीय? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Navi Mumbai News: नवी मुंबईकरांमध्ये घबराट"
NDTV Marathi

Navi Mumbai News: नवी मुंबईतील उच्चभ्रू आणि गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीबीडी-बेलापूरमध्ये स्थानिक सध्या दहशतीखाली वावरत आहेत. परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. बंद घरांची रेकी करून किंवा घराचे दरवाजे उघडे दिसताच आत शिरून बेधडक चोऱ्या केल्या जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरलीय आणि पोलिसांनी तातडीने गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे.

शहाबाज गावातून 6 मोबाइल लंपास

बेलापूरमधील शहाबाज गाव परिसरात नुकतीच एक मोठी चोरीची घटना घडली. येथे नोकरीनिमित्त एकत्र राहणाऱ्या तरुणांच्या घरात दरवाजा उघडा असताना चोरट्याने प्रवेश केला आणि तब्बल 6 मोबाइल फोन लंपास केले. या प्रकरणी मोनू शोरान या तरुणाने एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. गावठाण भागात सकाळी अनेकदा घरांचे दरवाजे उघडे असतात, याचाच फायदा घेऊन चोरटे नजर पडेल तो ऐवज पळवत आहेत.

(नक्की वाचा: Nagpur News: नागपूरचा सुपुत्र परदेशातील जेलमध्ये कैद; कंपनीच्या एका चुकीमुळे कुटुंब अडचणीत, धक्कादायक प्रकार समोर)

आर्टिस्ट व्हिलेजमध्ये सीसीटीव्हीशी छेडछाड

चोरटे आता इतके निर्ढावले आहेत की, त्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही भीती राहिलेली नाही. सोमवारी (16 फेब्रुवारी) पहाटे सीबीडी सेक्टर 8 मधील 'आर्टिस्ट व्हिलेज' येथे दोन चोरट्यांनी घरफोडी केली. त्यांनी भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तोंड दुसरीकडे फिरवण्याचा प्रयत्न केला. पण चोरट्यांचा हा डाव फसला. त्यांनी तोडलेला कॅमेरा सुरूच राहिल्याने त्यांचे संपूर्ण कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. चोरीचा मुद्देमाल घेऊन हे चोरटे पसार झाले आहे. आता पोलीस या फुटेजच्या आधारे त्यांचा शोध घेत आहेत.

नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

सतत होणाऱ्या या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांना आता घर बंद करून बाहेर जाण्याचीही भीती वाटू लागली आहे. रात्रीच्या वेळी बंद घरांची रेकी केली जाते आणि संधी मिळताच हात साफ केला जातो. अशा परिस्थितीत घर आणि घरातील मौल्यवान वस्तू कशा सुरक्षित राहणार? असा सवाल स्थानिक विचारतायेत. काही महिन्यांपासून संपूर्ण शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रात्रीची गस्त वाढवावी आणि या सराईत गुन्हेगारांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी बेलापूरकरांकडून होत आहे.

Advertisement
Topics mentioned in this article