दोन दिवसांनी तलावात सापडला तरुणाचा मृतदेह, प्रेयसीच्या हत्येमागचे वाढले गूढ

अक्षता म्हात्रे सामूहीक बलात्कार आणि खून प्रकरण, त्यापाठोपाठ घडलेले यशश्री शिंदे हत्या प्रकरण यामुळे नवी मुंबई परिसरात आधीच चिंतेचे वातावरण आहे

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी मुंबई:

राहुल कांबळे

नवी मुंबईतील सीवूडस परिसरातील डीपीएस शाळेच्या परिसरात एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. 19 वर्षांच्या या तरुणीचा खून तिच्या प्रियकराने केला असावा असा संशय व्यक्त केला जात होता. शुक्रवारी या तरुणीच्या प्रियकराचाही मृतदेह पोलिसांना सापडला आहे. यामुळे या प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले आहे. नवी मुंबई पोलिसांना गुरुवारी या तरुणीचा मृतदेह सापडला होता. डीपीएस शाळेच्या तलावात मासेमारी करण्यासाठी येणाऱ्या मच्छीमारांनी हा मृतदेह पाहिला आणि पोलिसांना खबर दिली. हा मृतदेह नेरूळ येथील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या तरुणीचे  पनवेल इथे राहणाऱ्या स्वस्तिक पाटील (22वर्षे)सोबत प्रेमसंबंध होते. 

तरुणीचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या तरुणीच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.  पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर त्यांना हे जोडपे बुधवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास दुचाकीवरून तलावाकडे जाताना दिसले होते. या मुलीच्या मृत्यूचे गूढ अजून नीटपणे उकललेही नव्हते तोच पोलिसांना तिच्या प्रियकराचाही मृतदेह सापडला. नवी मुंबई अग्निशमन दल आणि पोलिसांनी शुक्रवारी पहाटे वाघोली इथून 22 वर्षीय स्वस्तिक पाटीलचा मृतदेह शोधून काढला. पाटील याने त्याच्या प्रेयसीची हत्या करून नंतर तलावात उडी मारली असावी असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वस्तिक आणि तरुणीचे गेली 2 वर्ष प्रेमसंबंध होते. यापूर्वी त्यांच्यात काही कारणामुळे वाद झाला होता. डीपीएस परिसरात येण्यापूर्वी आणि नंतरही दोघांमध्ये वाद झाला असावा असा पोलिसांना संशय आहे.अक्षता म्हात्रे सामूहीक बलात्कार आणि खून प्रकरण, त्यापाठोपाठ घडलेले यशश्री शिंदे हत्या प्रकरण यामुळे नवी मुंबई परिसरात आधीच चिंतेचे वातावरण आहे, अशातच हा खून झाल्याने पुन्हा एकदा नवी मुंबई हादरली आहे.  

Advertisement