नागपूरमधील एका प्रसिद्ध ज्वेलरी मॉलमधून बेमालूमपणे महागडी रिंग चोरी करणाऱ्या लेडी थीफचा शोध पोलीस घेत आहेत. सुटाबूटात आलेल्या या महिलेनं या दुकानातून महागडी रिंग लंपास केली. तिची ही चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून ते फुटेज 'NDTV मराठी' च्या हाती लागलं आहे.
काय आहे प्रकरण?
नागपूरमधल्या एका प्रसिद्ध ज्वेलरी मॉलमध्ये ही महिला खरेदीच्या निमित्तानं आली होती. तिने सेल्स गर्ल पाहत असताना एक महागडी रिंग उचलली आणि ती ट्रे मधून काढून डाव्या हाताच्या बोटात सहज घातली. त्याचबरोबर तिने सेल्स गर्लचा विश्वास संपादन करत तिला बोलण्यात गुंतवून ठेवले.
महिलेनं बोलण्यात लक्ष विचलित केल्यानं तिनं रिंग उचलून घेतल्याचा विसर सेल्स गर्लला पडला. ती ट्रे घेऊन परत गेली.
( नक्की वाचा : धक्कादायक! घरात मुलीचा मृतदेह, हॉटेलमध्ये प्रियकरासोबत पार्टी करत होती निर्दयी आई )
त्यानंतर या महिलेनं आजूबाजूला कुणी पाहात नसल्याची खात्री घेतली. प्रथम डावा आणि नंतर उजवा हात टेबलखाली नेला. त्यानंतर रिंग काढून ती सहज पँटच्या खिश्यात ठेवली. आजूबाजूला कुणीच पाहात नसल्याचं लक्षात आल्यानंतर ती सावरुन बसला. मात्र मॉलमधील CCTV मध्ये तिची सर्व हलचाल कैद झाली होती. काही वेळानं रिंग चोरी झाल्याचं लक्षात आल्यानंतर CCTV फुटेजच्या तपासणीमध्ये हा चोरीचा प्रकार समोर आला.
ज्वेलरी मॉलमध्ये नोंदणी करताना तिने स्वत:चे नाव शितल ठवकर असल्याचे सांगितले आहे. या महिलेनं सांगितलेला फोन नंबर आणि सीसीटीव्हीमध्ये दिसणारा तिचा चेहरा या आधारे नागपूर पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत. या महिलेनं अशाच पद्धतीनं अन्य सराफा दुकानातही उचलेगिरी केल्याचा संशय पोलिसांना आहे.