सर्वसामान्य नोकरदार वर्गाच्या आयुष्यात पगारवाढ हा खूप महत्वाचा क्षण असतो. साधारणपण मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान प्रत्येक कर्मचाऱ्याला पगारवाढीची अपेक्षा असते. कधीकधी अनेकांना अपेक्षेपेक्षा जास्त तर काहींना नाममात्र पगारवाढ मिळते. इन्क्रिमेंट हा विषय घरादारापासून ते मित्रपरिवारापर्यंत चर्चेत असतो. परंतु डोंबिवली येथे एक वेगळाच प्रकार पहायला मिळाला आहे. शिक्षीका असलेल्या पत्नीचं इन्क्रिमेंट होत नसल्याच्या रागातून पतीने रागाच्या भरात मुख्याध्यापकावर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. या अपघातात जखमी झालेल्या मुख्याध्यापकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून डोंबिवली रेल्वे पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
नेमकं प्रकरण आहे तरी काय?
मिनाज शेख ही महिला डोंबिवलीच्या खारबावला भागातील एका शाळेत शिक्षीका आहे. परंतु मिनाजची शाळेच्या सर्व्हिस बुकमध्ये नोंद केली जात नसल्यामुळे तिचं इन्क्रिमेंट होत नव्हतं. यावरुन मिनाज शेख आणि मुख्याध्यापक भागवत गुरव यांच्यात नेहमी वाद व्हायचे. अनेकदा विनंती करुनही मिनाजच्या पदरी अपयशच पडलं. सरतेशेवटी मिनाजने हा प्रकार आपला पती शकील शेख याला सांगितलं.
पतीचा राग अनावर, मुख्याध्यापकावर केला हल्ला -
हा प्रकार ऐकताच शकील शेख याचा राग अनावर झाला. त्याने मुख्याध्यापक भागवत गुरव यांना दिवा-वसई रेल्वे मार्गावर असलेल्या खारबावला रेल्वे स्थानकावर गाठले. तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत यावेळी शकील शेख याने गुरव यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात गुरव हे गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करुन नंतर कल्याण येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
अवश्य वाचा - अल्पवयीन भाच्यासोबतच्या संबंधातून आत्या गर्भवती; कोर्टाचा मोठा निर्णय
भागवत गुरव हे कल्याणला राहणारे असून ते दररोज कल्याण ते खारबावला असा प्रवास करतात. त्यांच्या या प्रवासाच्या वेळेची शकील शेख याला माहिती होती. ती वेळ साधतच शकीलने रेल्वे स्टेशनवर गुरव यांच्यावर हल्ला केला. हल्ला केल्यानंतर शकीलने तिकडून पळ काढला. परंतु डोंबिवली रेल्वे पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालत फरार आरोपी शकील शेखला अटक केली आहे.
अवश्य वाचा - मित्राच्या बायकोकडे का बघतो? फक्त एवढंच विचारलं, त्यानंतर अख्खं कल्याण रेल्वे स्टेशन हादरलं!