मेहबूब जमादार
रायगड जिल्ह्यातील अलिबाग-पेण मार्गावरील तीनविरा धरणा जवळ दरोडा टाकण्यात आला. यामध्ये 1 कोटी 50 लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार झाले. याची माहिती अलिबाग तालुक्यातील पोयनाड पोलिसांना कळविण्यात आली. ही घटना मंगळवारी दुपारी साडेचार ते पाचच्या दरम्यान घडली. हा दरोडा कुणी टाकला हा प्रश्न पोलिसांसमोर होता. त्यांनी तपासाची चक्र फिरवली. त्यावेळी जी माहिती पोलिसांच्या हाती लागली त्यावरू त्यांना ही धक्का बसला. त्याचे कारण म्हणजे हा दरोडा टाकणारे दुसरे तिसरे कोणी नव्हते तर पोलिसच होते हे तपासात समोर आले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रायगड पोलीसात या दरोड्यातील तीन पोलिस होते. या प्रकरणातला आरोपी समाधान पिंजारी याने नागपूर इथल्या नामदेव हुलगे यांच्याशी संपर्क साधला होता. हुलदे हे सोने व्यापारी आहेत. अलिबाग येथील शंकर कुळे यांच्याकडे 7 किलो सोने आहे. ते सोने 5 कोटी रुपयांमध्ये ते विकण्यास तयार आहेत असं हुलगे यांना सांगितलं. इतक्या स्वस्त दरात सोने मिळत असल्याने हुलगे हे पिंजारी याने दिलेल्या अमिषाला बळी पडले. त्यांनी हे सोने खरेदी करण्याला होकार दिला.
सोने खरेदी करण्याचे निश्चित झाले होते. त्यामुळे हुलगे हे 1 कोटी 50 लाख रुपये घेऊन नागपूरहून निघाले. त्यावेळी त्यांच्या सोबत चालक दीप गायकवाड आणि इतर मंडळी होते. ते एका कारमधून अलिबागकडे निघाले. पुढे ते तिनविरा धरणाजवळ आल्यावर गायकवाडने कार थांबविली. पोलीस आले आहेत, असे त्याने सांगितले. नंतर त्याने हुलगे यांना गाडीतून खाली उतरण्यास सांगितले. ते गाडीतून उतरले. तीथे आलेल्या पोलीसांनी गाडीची झडती घ्यावी लागेल असं सांगितलं. त्याच वेळी गाडीत असलेल्या दीप गायकवाडने कार पनवेलच्या दिशेने पळवली. हा सर्व कटाचा भाग होता.
तिथे असलेल्या पोलिसांनीही आपण ही गाडी पकडतो. त्यात असलेले तुमचे पैसे तुम्हाला परत करतो असे सांगत तिथून निघून गेले. याप्रकरणी अलिबाग तालुक्यातील पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात पोलीस हवालदार समीर म्हात्रे, विकी साबळे व सूर्यवंशी यांचा सहभाग असल्याची नोंद चौकशीनंतर पोलिसांनी केली आहे. यातील सूर्यवंशी हा रायगड पोलिसांचा कर्मचारी तर आहेच पण अनेक वर्ष स्थानिक गुन्हे अन्वेक्षण शाखा, अलिबाग पोलीस ठाणे येथे कार्यरत असल्याचे बोलले जाते.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सुचने नुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने चौघांना अटक केली आहे. त्यामध्ये समीर म्हात्रे, विकी साबळे या पोलीस कर्मचाऱ्यासह समाधान पिंजारी, दीप गायकवाड यांना अटक करून करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले होते. शिवाय त्यांच्याकडून दीड कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी चार आरोपी अटकेत तर अन्य 2 फरार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. दरम्यान गाडी पकडण्यासाठी गेलेले पोलिस पनवेल नाही तर पोयनाडमध्येच दिसल्याने हुलगे यांना संशय आला. त्यानंतर हे बिंग फुटलं.