देवा राखुंडे
पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील सराटीमध्ये जगदाळे फार्मवर परवाना असलेलं पिस्तुल हलगर्जीपणाने हाताळल्याने त्यातून सुटलेल्या गोळीतून एक जण जखमी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. 24 मे रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील जगदाळे फार्म हाऊसवर ही घटना घडली. सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील रहिवासी आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यानंतर इंदापूर पोलिसांनी आता चौघांविरोधात विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रदिप नानासाहेब जगदाळे, सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख, विजय शिवाजी पवार आणि राजकुमार दिलीपराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा - Ambernath News : अंबरनाथमधील हॉटेलच्या सॉसमध्ये मेलेल्या माश्या; पाईपलाईन रोडवरील 5K हॉटेलमधील धक्कादायक प्रकार
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल शनिवारी 24 मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील सराटी येथील जगदाळे फार्महाउसवर सुधीर महाडिक देशमुख यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने ही सर्व मंडळी एकत्र आली होती. याच वेळी राजकुमार दिलीपराव पाटील यांच्याकडील परवानाधारक पिस्तुल सुधीर महाडिक देशमुख हातळत होते. आणि याच वेळी या पिस्तुलमधून गोळी सुटली ती थेट सुधीर महाडिक यांच्या छातीच्या उजव्या बाजूला लागली. यामध्ये ते जखमी झाले. त्यांच्यावर सध्या पुण्यात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून बंदुकीची रिकामी पितळी पुंगळी, एक हुक्का कप पाईप, एक पत्यांचा सेट मिळाला असून पोलिसांनी फरशी वरती पडलेले रक्ताचे नमुने देखील घेतलेले आहेत. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत अधिक तपास करीत आहेत.