Double Murder : त्यानं शेजारच्या महिलेची 2019 मध्ये हत्या केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पण, त्याचं समाधान झालं नव्हतं. तो सहा वर्षांनी जामिनावर बाहेर आला. त्यावेळी त्यानं त्या महिलेचा 55 वर्षांचा नवरा आणि 75 वर्षांच्या वृद्ध सासूची हत्या केली आहे. या दुहेरी हत्याकांडानंतर नागरिकांमध्ये संतप्त वातावरण आहे.
केरळमधील पल्लकड जिल्ह्यातील नेनमारा शहरात हे दुहेरी हत्याकांड झालं आहे. 55 वर्षांचे सुधाकरण आणि त्यांची आई लक्ष्मी (वय 75) यांची सोमवारी त्यांच्या राहत्या घरात चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणात त्यांचा शेजारी चेंथमारा हाच आरोपी आहे. त्यानं सुधाकरन यांच्या पत्नीची 2019 मध्ये हत्या केली होती. तो सध्या जामिनावर बाहेर आहे.
पोलिसांनी 36 तासांच्या शोध मोहिमेनंतर चेंथमाराला अटक केलं. सर्वांना हादरवून सोडणाऱ्या या हत्याकांडाबाबत नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. त्यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर प्रदर्शन केलं. या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे कारण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंथमारानं दोघांच्या हत्येची कबुली दिली आहे. सुधाकरन त्याच्या पत्नीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आपल्यावर हल्ला करेल, असा त्याला संशय होता. त्यामुळे चेंथामरनं सुधाकरन आणि त्याच्या आईला ठार मारले.
काही रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, सुधाकरनच्या कुटुंबानं केलेल्या जादू टोण्यामुळे आपल्याला पत्नी सोडून गेली अशी चेंथमाराची समजूत होती. याच कारणामुळे त्यानं 2019 मध्ये सुधारकरणची पत्नी सजिताची हत्या केली होती.
स्वत:च्या पत्नीच्या हत्येचंही होतं नियोजन
2019 साली संजिताच्या हत्येनंतर सुधाकरननं दुसरं लग्न केलं होतं. त्याची दुसरी पत्नी आणि मुलगी हा हल्ला झाला त्यावेळी घरी नसल्यानं वाचल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेंथमारानं त्याच्यापासून वेगळं राहणाऱ्या पत्नीचीही हत्या करण्याची योजना तयार केली होती. हे दोन्ही हत्याकांड पूर्व नियोजित होते. चेंथमारानं यासाठी खास हत्यार खरेदी केले होते.
( नक्की वाचा : मुजोरी कराल तर ही शिक्षा, रिक्षा चालकाला कल्याण पोलिसांनी दिली अशी शिक्षा की इतरांनाही बसली जरब )
फाशीच्या शिक्षेची मागणी
सुधाकरन यांच्या मुलींनी चेंथमाराला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितलं की, 'त्यानं 2019 साली आमच्या आईची हत्या केली आणि जेलमध्ये गेला. बाहेर आल्यानंतर आमचे वडील आणि आजीला ठार मारलं. आता त्याला अटक करुन जेलमध्ये टाकण्यात आले आहे. काही वर्षांनी त्याला सोडून देण्यात येईल. तो पुन्हा लोकांना ठार मारेल.
चेंथमाराला शेजारी राहण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी आपण पोलिसांकडं केली होती, असा दावा सुधाकरन यांच्या मुली आणि शेजाऱ्यांनी केला आहे. पण, पोलिसांनी आपलं ऐकलं नाही, असा आरोप त्यांनी केला.