पाकिस्तानचा कुख्यात डॉन शहजाद भट्टी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने थेट भारतातल्या मुख्यमंत्र्यांनाच धमकी दिली आहे. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचा हिजाब वाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. एका नियुक्ती पत्र वाटप सोहळ्यात मुस्लिम महिला डॉक्टरचा हिजाब ओढल्याचा आरोप नीतीश कुमार यांच्यावर होत आहे. तसा एक व्हिडीओ ही व्हायरल होत आहे. या प्रकरणावरून पाकिस्तानचा कुख्यात डॉन शहजाद भट्टी याने मुख्यमंत्र्यांना धमकी दिली आहे. "नीतीश कुमार यांनी त्या महिलेची माफी मागावी, अन्यथा परिणाम भोगावे लागतील," असा इशारा भट्टीने एका व्हिडिओद्वारे दिला आहे.
काही दिवसांपूर्वी एका सरकारी कार्यक्रमात नीतीश कुमार एका महिला डॉक्टरला नियुक्ती पत्र देत असताना त्यांनी तिच्या चेहऱ्यावरील हिजाब ओढला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरजेडीसह विरोधी पक्षांनी त्यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. ही घटना महिलेच्या सन्मानाला धक्का लावणारी असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. यावरून बिहारमध्ये सध्या राजकारण चांगलेच तापले आहे.
या धमकीवर बिहारचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री मोहम्मद जमा खान यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. "त्या डॉनची बिहारकडे वाकड्या नजरेने पाहण्याचीही लायकी नाही," असे त्यांनी ठणकावून सांगितले. नीतीश कुमार हे त्या महिलेच्या वडिलांच्या वयाचे असून त्यांनी केवळ एका पालकाच्या नात्याने आणि प्रेमाने तिचे तोंड पाहिले. यात कोणतीही चुकीची भावना नव्हती, असे स्पष्टीकरणही सरकारने दिले आहे. मात्र यात आता पाकिस्तानच्या डॉनची एन्ट्री झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.