आकाश सावंत
कला केंद्रात नृत्याचे काम देण्याचे आमिष दाखवून एका तरुणी सोबत भयंकर प्रकार घडला आहे. बीडच्या अंबाजोगाईत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नृत्याची आवड असलेल्या मुलीला कलाकेंद्रात काम देतो असं सांगितलं. शिवाय त्यासाठी तिला पैसे ही देण्यात येणार होते. या बहाण्याने बारामतीच्या तरुणीला अंबाजोगाईला आणून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणई एका महिलेसह चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा गुन्हा आंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आला आहे.
बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. 24 एप्रिल 2025 रोजी अंबाजोगाई येथील बदामबाई गोकुळ या महिलेने संबंधीत तरुणीसोबत संपर्क केला होता. आपल्या कलाकेंद्रात नृत्यासाठी मुलींची गरज आहे. तिथे तुला नृत्य शिकवले जाईल. त्याचे पैसे ही दिले जातील असं तिने पीडित तरुणी आणि तिच्या आईला सांगितले. बदामबाईने दाखवलेल्या या आमिषाला त्या दोघी ही बळी पडल्या. तिने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून त्यांनी मुलीला बीडला पाठवण्याची तयारी दाखवली. त्या तरुणीला बारामतीतून अंबाजोगाई येथील 'पायल कलाकेंद्र' येथे नेण्यात आले.
मात्र तरुणीला तिथे काही तरी गडबड आहे असं जाणवले. त्यामुळे तिने तिथे राहण्यास नकार दिला. त्यानंतर बदामबाई आणि इतर दोघांनी पीडितेला बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर पीडितेला जबरदस्तीने अंबाजोगाई येथील 'साई लॉज'वर नेण्यात आले. तेथे बदामबाईने पीडितेला तीन पुरुषांच्या ताब्यात दिले. त्यानंतर ती तिथून निघून गेली. लॉजवर उपस्थित असलेल्या मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीने पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला पुन्हा गाडीतून पायल कलाकेंद्र येथे आणून सोडण्यात आले. या तरुणीला जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले. या सर्व प्रकाराने ही तरुणी हादरून गेली होती.
अत्याचारानंतर पीडितेने आपल्या आईशी फोनवर संपर्क साधला. शिवाय झालेला सर्व प्रकार तिला सांगितला. आईने ही तातडीने अंबाजोगाई गाठून मुलीची सुटका केली. शिवाय आपल्या मुलीला परत बारामतीला आणले. यानंतर पीडितेच्या आईने बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी बदामबाई गोकुळ, मनोज कालिया,प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिथून हा गुन्हा अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. आरोपींचा शोध पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world