मनोज सातवी, पालघर:
Nalasopara Crime: नालासोपाऱ्यात आईकडून अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. लहान भावंडांना मारते म्हणून आईनेच मुलीच्या डोक्यात वरवंटा घालून तिचा जीव घेतला. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबतचा अधिक तपास सध्या सुरु आहे.
आईने केली मुलीची हत्या..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नालासोपारा पूर्वेतील संतोषभुवन परिसरात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. लहान भावंडांना मोठी मुलगी मारायची म्हणून डोक्यात राग गेलेल्या एका आईने मुलीच्या डोक्यात वरवंटा घालून तिला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत मुलीचे नाव अंबिका प्रजापति (वय १५) असे असून, ती पाच भावंडांपैकी सर्वात मोठी होती.
सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर परिसरात भीती व संतापाचे वातावरण पसरले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी महिला कुमकुम प्रजापति हिला ताब्यात घेतले असून हत्या करण्यामागील कारणाचा शोध सुरू आहे. कुटुंबातील सदस्यांची चौकशी करत पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.
बुलढाण्यात शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण
बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद शाळेत चौथ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षक चीम यांनी लोखंडी स्केल पट्टीने अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दुसरीकडे गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमार्फत चौकशी करून दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिले आहेत, त्यामुळे आता या शिक्षकांवर शिक्षण विभागाकडून काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.