मनोज सातवी
पालघर जिल्ह्यातील मनोरमध्ये सोमवारी एका महिलेचा मृतदेह सापडला होता. महिलेच्या मृतदेहाला दगड बांधून ठेवण्यात आले होते. या विचित्र प्रकाराने पोलीस चक्रावले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर चौकशीला सुरुवात केली असता त्यांना कळाले की हा मृतदेह सुष्मिता डावरे (28 वर्षे) यांचा आहे. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांना कळाले की सुष्मिता यांचा नवरा घटना घडली तेव्हा घरी नव्हता आणि तो मासेमारीसाठी समुद्रात गेला होता. सुष्मिता यांची दोन वर्षांची मुलगीही बेपत्ता झाल्याचे पोलिसांना कळाले होते. पोलिसांना सुष्मिता यांचा मृतदेह मनोरमधल्या एका ओढ्यामध्ये दगडाने बांधलेल्या अवस्थेत सापडला होता. दुपारी साडे तीनच्या सुमारास त्यांना हा मृतदेह सापडला होता. सुष्मिता यांचा खून दुसरीकडे कुठेतरी करण्यात आला असावा आणि खून केल्यानंतर त्यांचा मृतदेह दगडाला बांधून ठेवण्यात आला असावा असा पोलिसांना संशय होता, जो नंतर खरा ठरला.
सुष्मिताचा नवरा प्रवीण हा मासेमारीचे काम करत होता आणि मासेमारीसाठी गेल्यानंतर बरेच दिवस बोटीवर असायचा. हत्या घडली तेव्हा पोलिसांना प्रवीणने तर ही हत्या केली नसावी ना? असा प्रश्न पडला होता, त्यांनी प्रवीण आणि सुष्मिता राहात असलेल्या 'सावरे' गावातील लोकांना नवरा बायकोचे भांडण होते का ? असा प्रश्नही विचारला होता. मात्र गावकऱ्यांनी दोघांमध्ये असे कोणतेही भांडण नव्हते असे सांगितले होते.
दीर आणि नणंद अटकेत
पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली तेव्हा त्यांना कळाले की डावरे कुटुंबात जमिनीवरून वाद सुरू होता. प्रवीणचा भाऊ संदीप आणि प्रवीणची बहीण सुमन करबट या दोघांचे प्रवीणसोबत वाद सुरु होते. या वादामुळे संदीप आणि सुमन यांनी प्रवीणला धडा शिकवायचा निर्णय घेतला होता. प्रवीण मासेमारीसाठी गेल्यानंतर बरेच दिवस घरी येत नाही हे या दोघांना माहिती होते. प्रवीण मासेमारीसाठी गेल्यानंतर या दोघांनी सुष्मिता आणि तिच्या मुलीला ठार मारले. ठार मारल्यानंतर या दोघांनी अवघ्या दोन वर्षांच्या मुलीला एका गोणीत भरले आणि त्यात दगड भरून ती गोणी ओढ्यात फेकून दिली होती. त्याचप्रमाणे सुष्मिताच्याही मृतदेहाला या दोघांनी दगड भरलेली गोणी बांधून तिचा मृतदेह नाल्यात फेकून दिला होता. मृतदेह फुगून वर येऊ नये यासाठी या दोघांनी हे केलं होतं. मात्र सुष्मिताचा मृतदेह वर आल्याने या दोघांचे बिंग फुटले.
तपास भरकटवण्याचा आरोपींचा प्रयत्न
पोलिसांनी सदर घटनेबाबत माहिती देताना सांगितले की संदीप आणि सुमन यांच्याकडेही आधी चौकशी करण्यात आली होती. यावेळी या दोघांनी तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. ही हत्या प्रवीणने केली असावी असे सांगत संदीपने पोलिसांची दिशाभूल करायचा प्रयत्न केला होता. यानंतर त्याने आणि सुमनने वाड्यावरून काही हिंदी बोलणारी माणसे आली होती आणि त्यांनीच हे केले असावे असा संशय व्यक्त केला होता. मात्र पोलिसांच्या तपासात सगळ्या बाबी उघड झाल्या असून पोलिसांनी संदीप आणि सुमनला अटक केली आहे. या दोघांना पालघर न्यायालयात हजर करण्यात येईल.