मनोज सातवी
वसई तालुक्यातल्या भारोळ गावातील एका विद्यार्थ्याने ड्रायव्हर गाडी थांबवत नाही म्हणून धावत्या पिकप टेंपोमधून उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली आहे. यश जाबर असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो इयत्ता नववी या वर्गात शिकत आहे. त्याच्यावर सिलवासा येथील विनोबा भावे रुग्णालयात उपचार करण्यात आले. यश शाळेतून घरी परत येत असताना पिकप टेम्पोमध्ये मागे बसला होता. मात्र त्याच्या गावाच्या ठिकाणी उतरायचे असताना ड्रायव्हरला सांगून देखील ड्रायव्हर गाडी थांबवत नाही म्हणून, तो घाबरला आणि त्याने धावत्या वाहनातून उडी मारली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारोळ गावातील जिल्हा परिषद शाळेचे नववी-दहावीचे वर्ग बंद केल्यामुळे येथील 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे समायोजन आठ किलोमीटर अंतरावरील खानिवडे आणि 14 किलोमीटर अंतरावरील चांदीप येथील शाळेत करण्यात आले आहे. शाळेचे अंतर दुरचे असल्याने विद्यार्थ्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'दाऊदचा फोन, RSS चा डॉक्टर अन् खंडाळ्यात एन्काऊंटर' सदावर्तेंचे धक्कादायक खुलासे
पालघर जिल्हा परिषदने नववी-दहावीचे वर्ग बंद केले. याचा विद्यार्थ्यांना कसा फटका बसतो याविषयीचे वृत्त NDTV मराठीने दाखवून सातत्याने पाठपुरावा केला होता. विशेष म्हणजे जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी भानुदास पालवे यांच्या वर्ग बंदच्या निर्णयाबाबत अनभिज्ञ असलेले जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम आणि शिक्षण सभापती पंकज कोरे यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. याबाबत तातडीने जिल्हा परिषदेने बंद केलेले वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्षात अद्यापही हे वर्ग सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेच्या मनमानी आणि भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले जात आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश भुरकुंड यांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - कोकणात भाजपचे नमते? शिंदेंच्या सेनेला झुकते माप,भाजपच्या पदरात किती जागा?
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील भारोळ येथे धावत्या गाडीतून एका विद्यार्थ्याने उडी मारली. त्यानंतर हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. पालघर जिल्हा परिषदेच्या अनागोंदी कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. या घटनेनंतर तरी जिल्हा प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांची होणारी ही हेळसांड कधी थांबणार असा प्रश्न पालकही विचारू लागले आहेत.