मनोज सातवी, प्रतिनिधी
Palghar News : कार्यालयातून अचानक कामावरुन काढून टाकल्यानंतर कर्मचाऱ्यांसमोर बेरोगजगारीचं मोठं संकट उभं राहतं. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे. अचानक बेरोजगारीचं संकट आल्यानंतर कर्मचाऱ्यासमोर मोठं संकट उभं राहतं. यातून मार्ग कसा काढावा हे देखील त्या क्षणी कळत नाही. अशावेळी मालकाशी बोलावं किंवा त्यांना विनंती करावी अशीच इच्छा असते. पालघरमध्ये मालकीणीला जाब विचारायला गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर कार घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर पूर्वेच्या वेवूर येथील मस्तांग इंटरप्राइजेस या कंपनीतील कामगारांना पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आले होते. १२ तास काम करा, नाहीतर घरी बसा असं फर्मान कंपनीने सोडलं होतं. त्यामुळे कामगारांनी कंपनीच्या मालकीणीशी बोलण्यासाठी तिची कार थांबवण्याचा प्रयत्न केला. कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान संतप्त झालेली कंपनीची मालकीण नाजनीन कात्रक यांनी कामगारांच्या अंगावर कार घातल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
यावेळी विद्या यादव (27) ही कामगार महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी सुरुवातीला पालघर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली होती, मात्र नंतर उशिराने कंपनी मालकिणीच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा - Harshvardhan Jadhav: पोलिसाच्या कानशिलात लगावणे माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना पडलं महागात
विशेष म्हणजे यावेळी अपंग असलेल्या कंपनी मालक नाजनीन यांनी ड्रायव्हरला खाली उतरायला सांगून स्वत: कारचा ताबा घेतला. त्यानंतर कामगारांच्या अंगावर कार घातली. यामध्ये विद्या रामकुमारी यांच्या पायावरून गाडी नेल्याने ती जखमी झाली. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.