जाहिरात

Pandharpur News :काळ आला होता सासूसाठी पण वेळ आली नवऱ्याची; अंगावर काटा आणणारी पंढरपूरची घटना!

Pandharpur Crime News: सासूचा काटा काढण्यासाठी सुनेने रचलेला कट तिच्यावरच उलटला.

Pandharpur News :काळ आला होता सासूसाठी पण वेळ आली नवऱ्याची; अंगावर काटा आणणारी पंढरपूरची घटना!
Pandharpur Crime News: या घटनेने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ माजली आहे
पंढरपूर:

संकेत कुलकर्णी , प्रतिनिधी


Pandharpur Crime News: पंढरपूर तालुक्यातील उंबर गावात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासूचा काटा काढण्यासाठी सुनेने रचलेला कट तिच्यावरच उलटला असून, यात सासूऐवजी नवऱ्याचाच दुर्दैवी अंत झाला आहे. अनैतिक संबंधांतून निर्माण झालेल्या वादाने एका सुखी संसाराचा भयानक शेवट केला असून या घटनेने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

काय आहे प्रकरण?

उंबर गावातील समाधान लोहार याची पत्नी सारिका हिचे प्रेमप्रकरण सुरू होते. या अनैतिक संबंधांची कुणकुण तिच्या सासूला लागली होती, ज्यामुळे घरात सतत खटके उडत होते. सासू आपल्या प्रेमात अडथळा ठरत असल्याचे पाहून सारिकाने आपल्या प्रियकराच्या मदतीने सासूचा जीव घेण्याचे ठरवले. यासाठी तिने घरातील पिण्याच्या पाण्याच्या कळशीत विष कालवून ठेवले. सासूने हे पाणी प्यावे आणि तिचा मृत्यू व्हावा, असा तिचा क्रूर डाव होता. मात्र, नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते.

( नक्की वाचा : Raigad News : मंत्र्यांचा मुलगा आरोपी, अन् तपास करणाऱ्या पोलिसाचा आत्महत्येचा इशारा; महाडमध्ये काय घडतंय? )
 

मागील महिन्यात 16 जानेवारी रोजी समाधान लोहार घराबाहेरून आला आणि त्याला मोठी तहान लागली होती. त्याने घरात जाताच पाणी पिण्यासाठी तीच कळशी उचलली ज्यामध्ये सारिकाने विष कालवले होते. सासूऐवजी समाधानने ते पाणी पिले आणि काही वेळातच त्याला उलट्यांचा त्रास सुरू झाला. 

त्याची प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान समाधानचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू वाटत असला तरी शवविच्छेदन आणि वैद्यकीय अहवालात समाधानच्या शरीरात विष गेल्याचे स्पष्ट झाले.

( नक्की वाचा : Shirdi News: 'बीफ खाल्ल्यावर गोरं होतं आणि नमाज...' शिर्डीत 15 वर्षांच्या मुलीचा लग्नासाठी छळ, वाचा सविस्तर )

पोलिसी तपासात गुपित उघड

समाधानच्या मृत्यूचा संशय आल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घरातील व्यक्तींची चौकशी केली असता सारिकाच्या वागण्यावर संशय बळावला. तांत्रिक तपास आणि चौकशीच्या फेऱ्यात सारिकाने आपला गुन्हा कबूल केला. 

सासूला मारण्यासाठी रचलेला कट नवऱ्याच्या जीवावर बेतल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नी सारिका लोहार हिला अटक केली आहे. या गुन्ह्यात तिला साथ देणाऱ्या प्रियकराचाही शोध पोलीस घेत असून पुढील तपास सुरू आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com