जाहिरात

Raigad News : मंत्र्यांचा मुलगा आरोपी, अन् तपास करणाऱ्या पोलिसाचा आत्महत्येचा इशारा; महाडमध्ये काय घडतंय?

Raigad News : भरत गोगावले यांच्या मुलाला वाचवण्यासाठी पोलीस दलावर राजकीय दबाव टाकण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलं आहे

Raigad News : मंत्र्यांचा मुलगा आरोपी, अन् तपास करणाऱ्या पोलिसाचा आत्महत्येचा इशारा; महाडमध्ये काय घडतंय?
Bharat Gogawale Son Vikas Gogawale Case : भरत गोगावलेंनी या विषयावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
रायगड:

प्रसाद पाटील, प्रतिनिधी

Bharat Gogawale Son Vikas Gogawale Case : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि शिवसेना नेते भरत गोगावले यांच्या मुलाला वाचवण्यासाठी पोलीस दलावर राजकीय दबाव टाकण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलं आहे. महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी थेट पोलीस महासंचालकांना पत्र लिहून आत्महत्येचा इशारा दिला आहे. या पत्रामुळे महाराष्ट्राच्या पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून, गोगावले पिता-पुत्राभोवती वादाचे जाळे निर्माण झाले आहे. दरम्यान भरत गोगावले यांनी 'NDTV मराठी'शी बोलताना हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

काय आहे प्रकरण?

महाड नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात मोठा राडा झाला होता. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील एका गुन्ह्यात मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले हा मुख्य आरोपी आहे. 

पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी आपल्या पत्रात स्पष्ट आरोप केला आहे की, विकास गोगावले याला या प्रकरणातून वाचवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला होता. बेकायदेशीरपणे इतर तीन व्यक्तींना या गुन्ह्यात अटक करण्यासाठी तडवी यांना भाग पाडले जात होते, मात्र त्यांनी त्याला नकार दिला.

( नक्की वाचा : Pune News : वेटर ते आंतरराष्ट्रीय तस्कर, बुधवार पेठेतील महिलांच्या नशिबाशी खेळणाऱ्या बाबू भैय्याचं गुपित उघड )

तडवींचे आरोप काय ?

विकास गोगावले याला सहकार्य करण्यास नकार दिल्याने रमेश तडवी यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तडवी यांनी पत्रात स्पष्ट केले आहे की, ते आदिवासी भिल्ल समाजाचे असल्याने त्यांना वारंवार जातीवाचक हीन वागणूक देण्यात आली. 

उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि इतर वरिष्ठ अधिकारी त्यांना "तू खालच्या जातीचा आहेस, तू इथे कसा राहतोस तेच बघतो" अशा धमक्या देत असत. राजकीय दबावाला बळी न पडल्यामुळे तडवी यांची दोन वर्षांत दोन वेळा विनाकारण बदली करण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या मानसिक त्रासात भर पडली.

( नक्की वाचा : Shirdi News: 'बीफ खाल्ल्यावर गोरं होतं आणि नमाज...' शिर्डीत 15 वर्षांच्या मुलीचा लग्नासाठी छळ, वाचा सविस्तर )

 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

रमेश तडवी यांनी आपल्या आत्महत्येच्या पत्रात रायगडच्या पोलीस अधिक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवधरे आणि इतर सात अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत. तडवी यांच्या दाव्यानुसार, या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून त्यांचा छळ केला आणि विकास गोगावले याला वाचवण्यासाठी रचलेल्या कटामध्ये ते सहभागी होते. 

वारंवार होणारा अपमान आणि विनाकारण होणाऱ्या बदल्यांमुळे तडवी आणि त्यांचे कुटुंब प्रचंड तणावाखाली आहे. "आता हा अन्याय सहन होत नाही, त्यामुळे मी आणि माझे कुटुंब आत्महत्या करीत आहोत," असे टोकाचे पाऊल उचलण्याची भाषा तडवी यांनी पत्रात केली आहे.

नार्को टेस्टची मागणी

भरत गोगावले यांनी या प्रकरणावर NDTV मराठी शी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी तडवी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणाचा आमचा काहीही संबंध नाही. तडवींची नार्को टेस्ट करा, अशी मागणी त्यांनी केलीय.

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com