राहुल कांबळे
पनवेल शहरातील करंजाडे सेक्टर-7 येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या रागातून भावानेच सख्ख्या भावाचा दगडाने ठेचून खून केला आहे. विशेष म्हणजे, पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या बिट मार्शल पथकाने केवळ एका तासाच्या आत आरोपीला गजाआड करून गुन्हा उघडकीस आणला आहे.मिळालेल्या माहितीनुसार 27 सप्टेंबर रोजी रात्री 8:37 वाजता डायल 112 द्वारे पोलिसांना संदेश मिळाला की करंजाडे सेक्टर-7 पोलिस चौकीसमोरील रस्त्यावर एका 45 वर्षीय पुरुषाचा दगडाने ठेचून खून झाला आहे. तत्काळ बिट मार्शल पथक घटनास्थळी धावून गेले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यास ही माहिती दिली.
पोलिस अंमलदार विलास बिराजी कारंडे व राजेंद्र कृष्णा केणी यांनी घटनास्थळी नागरिकांकडून माहिती गोळा केली. आरोपी कसा होता. कोण होता. त्याला कुणी ओळखतं याबाबत त्यांनी घटनास्थळी चौकशी केली. त्यानंतर त्यांना जी काही माहिती मिळाली त्या आधारे त्यांनी आरोपीचा शोध सुरू केला. त्यादरम्यान आरोपी नागेश वाल्या काळे हा पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी पोलिसांनी त्याला पकडले. त्याला पकडल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यातू त्याने कबूल केले की दत्तु वाल्या काळे याचा आपण खून केला आहे.
खून करणारा आणि खून झालेला हे दोघेही सख्खे भाऊ होते. दत्तू काळे ज्याचा खून झाला त्याचे त्याच्याच चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. ही बाब समोर आल्यानंतर आरोपी नागेश चिडला होता. त्याच वेळी त्याने आपल्या भावाला धडा शिकवण्याचं ठरवलं होतं. त्यात रागातूनच नागेश याने दत्तुच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.