Panvel News : पनवेलमध्ये थरार, कोयत्याच्या धाकावर नातेवाईक ओलीस ठेवणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

Panvel News :  मालमत्तेच्या वादातून एका सराईत गुन्हेगाराने पनवेलमधील आपल्याच नातेवाइकांना कोयत्याच्या धाकावर ओलीस ठेवले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
Panvel News : या प्रकरणात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
पनवेल:

राहुल कांबळे, प्रतिनिधी  

Panvel News :  मालमत्तेच्या वादातून एका सराईत गुन्हेगाराने पनवेलमधील आपल्याच नातेवाइकांना कोयत्याच्या धाकावर ओलीस ठेवले होते. हा थरार मंगळवारी रात्री पनवेल शहरात घडला. पनवेल पोलिसांनी केलेल्या शिताफीच्या कारवाईत आरोपीला जेरबंद करण्यात आले असून, सर्व ओलिसांची सुखरूप सुटका करण्यात आली. या घटनेत पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

काय आहे प्रकरण?

सोबन बाबुलाल महतो (वय 35) असे आरोपीचे नाव आहे. तो 2018 मधील एका खुनाच्या गुन्ह्यात आरोपी होता आणि नुकताच जामिनावर बाहेर आला होता. मालमत्तेच्या वादामुळे त्याने मंगळवारी रात्री पनवेलमधील मंगला निवास, गोडसे आळी येथील आपल्याच घरात आई-वडील, भाऊ आणि भावाची 3 लहान मुले यांना कोयता आणि कुऱ्हाड हातात घेऊन ओलीस ठेवले.

या घटनेची माहिती मिळताच प्रथम सहाय्यक पोलीस निरीक्षक  प्रज्ञा मुंढे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी आरोपीला शरण येण्याचे आवाहन केले, परंतु आरोपीने पोलिसांवरच हल्ला करण्याची धमकी दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शाकीर पटेल, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण फडतरे, पोलीस उपनिरीक्षिक अस्पतवार यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

( नक्की वाचा : इन्स्टाग्रामच्या फिल्टरने केला घात! 52 वर्षांची महिला पडली 26 वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात, अखेर भयंकर शेवट )
 

पोलिसांवर जीवघेणा हल्ला

पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने कुऱ्हाड आणि कोयत्याने पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलीस हवालदार रवींद्र पारधी, माधव शेवाळे, साईनाथ मोकल हे जखमी झाले. परिस्थिती अधिक गंभीर झाल्याने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. पाण्याचा फवारा आणि चिली स्प्रेचा वापर करून त्याला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आरोपीने अधिक आक्रमक होत एका 16 वर्षीय पुतणीच्या गळ्यावर कोयता ठेवून तिला ठार मारण्याची धमकी दिली.

Advertisement

पोलिसांची धाडसी कारवाई

या निर्णायक पोलीस हवालदार सम्राट डाकी आणि पोलीस शिपाई साईनाथ मोकल यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आरोपीवर झडप घातली. या धाडसी कारवाईत त्यांनाही गंभीर दुखापत झाली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आरोपीला ताब्यात घेतले आणि सर्व ओलिसांची सुखरूप सुटका केली. जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 526/2025 अंतर्गत आरोपी सोबन महतोवर भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 121(2), 127(2), 132, 135, 140(2), 332(ब), 333, 351(2), 352 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीकडून हल्ल्यासाठी वापरलेला कोयता आणि कुऱ्हाड जप्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वपोनि नितीन ठाकरे करत आहेत.

Advertisement


 

Topics mentioned in this article