राज्यात महिलांवरील अत्याचार कमी होताना दिसत नाही. एका मागून एक घटना समोर येत आहेत. कल्याण, पुणे, अकोल्यात चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना या ताज्या आहेत. अशा एक मन पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. ही दुर्दैवी घटना परभणीमध्ये घडली आहे. पत्नीला तिसरीही मुलगी झाली म्हणून पतीला राग आला. त्या रागाच्याभरात त्याने पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत पेटवून दिलं. जिव वाचवण्यासाठी ती घराबाहेर सैरावैरा पळू लागली. पण तिच्या मदतीला कोणी धावले नाही. अखेर तिचा मृत्यू झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सर्वांना हादरवून सोडणारी ही घटना परभणीतल्या गंगाखेड नाका परिसरातील आहे. कुंडलिक काळे आणि मैना काळे हे दाम्पत्या एका झोपडीत राहातात. त्यांना दोन मुली आहे. असे चौघे जण या झोपडीत राहातात. मैना काळे यांनी नुकतीच तिसरीही मुलगी झाली. कुंडलिक काळे यांना दोन मुलींनंतर आता मुलगा होईल अशी अपेक्षा होती. मात्र तिसरी ही मुलगी झाली. त्यामुळे कुंडलिक नाराज होता.
तिसरी मुलगी का झाली म्हणून त्याने पत्नी मैना बरोबर भांडण काढले. शिवाय तिला रात्रीच शिवागाळ करण्यास सुरूवात केली. यातून त्याचं समाधान झालं नाही. तो आणखी आक्रमक झाला. त्याच्या अंगात हैवान घुसला. त्याने हाता पेट्रोल घेवून ते पत्नी मैनावर टाकले. ती गयावया करत होती. पण त्याने तिचे काही एक ऐकले नाही. क्षणाचाही विचार न करता त्याने तिला पेटवून दिले. त्याच अवस्थेती ती घराबाहेर पडली. मदतीसाठी ओरडू लागली. या आगीत बाजूची दुकानंही जळून गेली.
ही सर्व घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. ती जळाल्यामुळे तिच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या होत्या. त्याच अवस्थेत तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याच वेळी तिला मृत घोषीत करण्यात आलं. मैना काळे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या बहिणीने कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, तक्रारीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी कुंडलीक काळे याच्याविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. शिवाय आरोपीला अटक केली आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ही घटना दुदैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या विकृती विरोधा आजही लढा लढावा लागतोय. समाजाने मानसिकत बदलण्याची गरज आहे. शिवाय जनजागृती करण्याची गरज ही त्यांनी बोलून दाखवली. आरोपी पतीला कडक शिक्षा झाली पाहीजे. त्यासाठी आपण पोलिस अधिकाऱ्यां बरोबर बोलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.