रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि 2 कर्मचाऱ्यांचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील एका रुग्णालयात घडली आहे. रुग्णालयातील हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणात डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे. यापूर्वीही डॉक्टरांवरील हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ़डोंबिवलीतील घटनेनंतर डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील स्टार कॉलनी परिसरात आरोग्यम रुग्णालयात आहे. 20 तारखेला सायंकाळी डोंबिवलीत राहणारे राज सिंह आपली पत्नी ज्योतीला घेऊन आरोग्यम रुग्णालयात गेले होते. ज्योती सिंह हिला पोटात दुखत होतं. राज याची आईदेखील सोबत होती. रुग्णालयातील डॉक्टरांनी ज्योतीवर उपचार सुरू केले. थोड्या वेळानंतर ज्योतीच्या त्रास कमी झाला. डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज देण्यास सांगितले.
हे ही वाचा : पत्नीचा छळ, पोलिसांची धमकी; तरुणाची गळफास घेत आत्महत्या
डिस्चार्ज देत असताना ज्योतीला परत पोटात वेदना सुरू झाल्या. डॉक्टरांनी ज्योती हिला पुन्हा अॅडमिट होण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी ज्योतीला सिटीस्कॅन आणि इतर तपासण्या करायला सांगितल्या. हे ऐकून ज्योतीचे नातेवाईक संतापले. हा वाद इतका विकोपाला गेला की, ज्योतीचे पती राज सिंह आणि सासू सुशीला सिंह या दोघांनी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत वाद घालायला सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यादरम्यान राज आणि सुशीला या दोघांनी रुग्णालयातील डॉक्टर नितीन खोटे आणि इतर दोन कर्मचाऱ्यांना चावा घेतला. हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी ज्योतीचे पती राजसिंग आणि राज याची आई सुशीला विरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे.