- मनोज सातवी, प्रतिनिधी
विरार पुर्व येथील मनवेलपाडा परिसरात २८ वर्षाच्या एका विवाहीत तरुणाने गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. अभय पालशेतकर असं या तरुणाचं नाव असून, पत्नीकडून होत असलेला छळ आणि त्यानंतर खोटी तक्रार दाखल केल्यामुळे पोलिसांकडून होत असलेली दमदाटी या कारणांमुळे अभयने राहत्या घरी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. आत्महत्येआधी अभयने व्हिडीओ करत नातेवाईकांना आपल्यावर ओढावलेली आपबिती सांगितली.
नेमकं झालं तरी काय?
विरार पुर्वेला राहणाऱ्या अभय पालशेतकर या तरुणाचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. 15 मे ला त्याच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार होतं. परंतु त्याआधीच छळाला कंटाळत अभयने आपलं आयुष्य संपवलं.
व्हिडीओत अभय काय म्हणाला आहे?
आमच्या लग्नाला १५ मे ला एक वर्ष पूर्ण होईल. परंतु आतापर्यंत मला जे काही भोगावं लागलं जे मी कोणालाही सांगितलं नाही ते मी सर्वांना सांगत आहे. माझ्या बायकोने माझ्याविरोधात मारहाण, शिवीगाळ करत असल्याची खोटी तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. मी बायकोला सतत कामावर जायला फोर्स करतो, औषधोपचारासाठी पैसे देत नाही अशी तक्रार बायकोने पोलिसांत दिल्याचं अभय म्हणाला आहे.
आपल्या सफाईत अभयने काय सांगितलं?
लग्न झाल्यापासून बायकोची तब्येत सतत खराब असायची. मी पहिल्यापासून तिला विचारायचो की तुला नेमकं काय होतंय...आपण डॉक्टरला दाखवून येऊया. आम्ही डॉक्टरांना दाखवूनही आलो परंतु तिच्या आजाराचं निदान झालंच नाही. याबद्दल मी तिच्या घरच्यांनाही सांगितलं. परंतु त्यांनी तिच्यावर कोणीतरी देवस्की केल्याचंही सांगितलं, ज्याच्यावर माझा कधीच विश्वास नव्हता.
काही महिन्यांनी मी तिला एका ठिकाणी कामाला लावलं. तिकडे ती दोन दिवस गेली आणि तिसऱ्या दिवसापासून पुन्हा घरीच राहिली. कामाला का केली नाहीस असं कारण विचारलं असता मी आजारी असल्याचं बायकोने सांगितलं. यावर मी तिला आपण डॉक्टरांना दाखवून येऊ असं म्हणालो असता तिने पुन्हा भांडायला सुरुवात केली आणि ती घर सोडून गेली. तिच्या घरच्यांना याबद्दल माहिती दिली असता त्यांनी मलाच दमदाटी करायला सुरुवात केल्याचं अभय पालशेतकरने व्हिडीओत सांगितलं आहे.
अवश्य वाचा - विवाहितेची 4 वर्षीय मुलासह इमारतीवरून उडी घेत आत्महत्या, पिंपरी चिंचवडमधील घटना
यापुढे जाऊन अभयने बायकोच्या माहेरील व्यक्तींना याबद्दल माहिती देत, दोन्ही घरच्यांची बैठक घेतली. ज्यात लग्न झाल्यानंतरही बायको सतत झोपून असते, कामं करत नाही. सतत आजारपणाचं कारणं देते हे स्पष्ट केलं. परंतु यानंतरही प्रकरण निवळलं नाही.
तुला कोंबडा करुन मारेन - पोलिसांची अभयला धमकी
पती आपल्याला मारहाण करत असल्याची तक्रार बायकोने पोलिसांत केल्यानंतर विरार पोलिसांनी आपल्याला दमदाटी केल्याचंही अभयने म्हटलं आहे. आपली बाजू पोलिसांनी ऐकून न घेता मला दमदाटी करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी मला कोंबडा करुन मारेन अशी धमकीही दिल्याचं अभय व्हिडीओत म्हणाला आहे.
मुंबईत स्वतःचं घर घेण्यापासून गावाला स्वतःचं घर बांधण्यापर्यंत ते बहिणीचं लग्न करुन तिचं बाळंतपण करेपर्यंत एकट्याच्या जिवावर करुनही बायकोच्या घरच्यांकडून माझ्या ऐपतीवर सतत प्रश्न निर्माण केले गेले. हे जगणं आपल्याला असह्य होत आहे. पहिल्यांदाच आईला पोलीस स्टेशनमध्ये बसून रहावं लागलं. हे जगणं आता सहन होत नसल्याचं सांगत अभयने नंतर आत्महत्या केली.
पत्नीवर गुन्हा दाखल, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची चौकशी होणार -
दरम्यान या घटनेनंतर विरार पोलिसांनी अभयच्या पत्नीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच अभयला धमकावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची विभागीय चौकशी होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world