उत्तर प्रदेशातील संभळ (Crime News) जिल्ह्यात कथित ऑनल किलिंग प्रकरणात खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या आठवड्यात आलेल्या वृत्तानुसार अल्पवयीन बलात्कार पीडितेला जामीनावर बाहेर आलेल्या कथित आरोपीने गोळ्या झाडल्या होत्या. 17 वर्षीय तरुणी त्यावेळी आपला भाऊ आणि आईसोबत दुचाकीवरुन जात होती. दरम्यान या प्रकरणातील अपडेट थरकाप उडवणारी आहे. पोलिसांच्या तपासानुसार पीडितेची आई आणि भावाने मिळून तिच्या हत्येचा प्लान आखला. यामध्ये पीडितेच्या मामाचाही समावेश आहे.
संभळचे एसपी कृष्णकुमार बिश्नोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, कैला देवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १८ सप्टेंबरच्या रात्री एका अल्पवयीन मुलीची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांनी रिंकु आणि पप्पू नावाच्या व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली होती. रिंकूवर बलात्काराचा आरोप होता. मात्र हत्येवेळी रिंकु रुग्णालयात आपल्या वडिलांसोबत होता. यानंतर पोलिसांनी तपासाचा मार्ग बदलला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रिंकूसोबत प्रेमसंबंध..
पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी धक्कादायक प्रकार सांगितलं. पीडितेच्या आईनेच मुलीच्या हत्येचा प्लान तयार केला होता. चौकशीदरम्यान कळालं की, रिंकूसोबत पीडितेचे प्रेमसंबंध होते आणि तो तिला आपल्यासोबत घेऊन गेला होता. मात्र मुलगी अल्पवयीन असल्याने त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नक्की वाचा - सून चार महिन्यांची गर्भवती, सासुचं धक्कादायक पाऊल; तरुणीच्या मृत्यूने इंदापूर हादरलं!
आईने पकडलं अन् मामाने चालवली गोळी...
आई आणि तिच्या कुटुंबीयांना वाटलं की, पीडिता बलात्कार प्रकरणात रिंकूच्याविरोधात जबाब देणार नाही. ज्यामुळे कुटुंबाची बदनामी होईल. त्यामुळे आईने पीडितेला संभळच्या घरी बोलावलं होतं. हत्या करण्याच्या दिवशी पीडितेच्या आईने एका नातेवाईकांकडे जाण्याचं कारण सांगितलं आणि पीडितेला सोबत घेतलं. यावेळी पीडितेचा भाऊही सोबत होता. भररस्त्यात त्यांनी पीडितेला गोळी मारून ठार केलं.
दुसरीकडे त्याचवेळी रिंकूच्या वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे तो रुग्णालयात होता. सीसीटीव्हीमधून हे स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे पोलिसांना पीडितेच्या कुटुंबाचा संशय आला. कारण पीडितेवर हल्ला झाला तरी तिची आई आणि भाऊ यांना खरचटलंही नव्हतं. मोबाइल सर्विलान्स आणि अन्य पुरावे हाती लागल्यानंतर पोलिसांनी आई आणि पीडितेच्या भावांना ताब्यात घेतलं.