राहुल कांबळे, प्रतिनिधी
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर भातण बोगद्यानजीक एक अपघात झाला. बुधवारी सकाळी 8.15 च्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये 20 पोलीस जखमी झाले आहेत. मुंबईहून पुण्याला बांगलादेशी घुसखोरांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठा साखळी अपघात झाला. आज सकाळी सुमारे 8.15 वाजता नवी मुंबई कंट्रोल रूमकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली होती. अपघातामध्ये जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे कळते आहे
कंटेनर उलटला, हायड्राला टेम्पो धडकला
सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या रस्त्यावर मोठा कंटेनर उलटला होता. यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. हा कंटेनर हटविण्यासाठी हायड्रा मशीन मागवण्यात आली होती. कंटेनर हटवला जात असताना या हायड्रा मशीनला एक आयशर टेम्पो धडकला होता. यामुळे एक लेन पूर्णपणे बंद झाली होती.
नक्की वाचा - Akola Crime: मद्यधुंद गुंडाचा हैदोस, तरुणावर प्राणघातक हल्ला, प्रकृती चिंताजनक
या अपघातांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये बांगलादेशी घुसखोरांना पुण्याला नेणारी पोलिसांची वाहनेही अडकली होती. यामधील पोलिसांचे एक वाहन एसटी बसला धडकले होते. पोलिसांच्या त्या वाहनाला मागून येणाऱ्या पोलिसांच्या इतर गाड्या धडकल्या. पोलीस व्हॅनपाठोपाठ येणारी एस्कॉर्ट स्कॉर्पिओदेखील आदळली होती. या साखळी अपघातामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला.
15 हवालदार जखमी
या अपघातात मुंबई शहर पोलीस दलातील तीन पोलीस उपनिरीक्षक आणि 11 अंमलदार जखमी झाले असून, यापैकी पीएसआय विजय माने हे गंभीररित्या जखमी झालेत. नवी मुंबई पोलीस दलातील 4 अंमलदारही या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. याशिवाय, पोलीस नेत असलेल्या बांगलादेशी घुसखोरांपैकी 12 जण जखमी झालेत.
जखमींची नावं...
वैशाली पाटील (WHC/1654 ), खांदेश्वर पोलीस ठाणे
संतोष थिटे (ASI ) , खारघर पोलीस ठाणे
रोहिदास हगवणे (PC/4600 ), पोलीस मुख्यालय
आशिष मोहिते (PC/3871), वाहन चालक
या सगळ्यांवर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाहतूक सुरळीत
अपघात झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक बराच काळ खोळंबली होती. अपघातग्रस्त वाहने मार्गातून दूर करण्यासाठी हायड्रा मशीन आणि क्रेन बोलावण्यात आली होती. ही सगळी वाहने बोगद्यातून बाहेर काढण्यात आली आणि मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.