Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता आक्रमक पाऊल उचलल आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने शहरातील तब्बल ६० कुख्यात आरोपींची यादी तयार केली असून या आरोपींच्या बेकायदेशीर घरांवर आणि इमारतींवर कारवाई करण्याची मागणी महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाने यासंदर्भात महापालिका आयुक्तांना लेखी पत्र पाठवून तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता संभाजीनगरमध्ये अमली पदार्थांच्या विक्री करणाऱ्यांच्या घरांवर बुलडोजर फिरवला जाणार आहे.
आरोपींच्या घरांवर बुलडोजर फिरवणार...
पोलीस तपासात असे निष्पन्न झाले आहे की, शहरातील अनेक अमली पदार्थ विक्रेते वारंवार अमली पदार्थांची साठवणूक आणि विक्री करण्यासाठी स्वतःच्या राहत्या घरांचा किंवा भाड्याच्या इमारतींचा वापर करत आहेत. हे आरोपी ज्या इमारतींमध्ये राहतात, त्या अनधिकृत असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या बेकायदेशीर व्यवसायामुळे संबंधित परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून सर्वसामान्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा आरोपींच्या घरांवर मनपाच्या माध्यमातून बुलडोजर फिरवला जाणार आहे.
६० आरोपींची यादी आणि ठिकाणे निश्चित..
पोलिसांनी सादर केलेल्या यादीत शहरातील विविध भागांतील ६० आरोपींचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने रविंद्रनगर, शहाबाजार, चंपाचौक, चिकलठाणा, उस्मानपुरा, नारेगाव, आणि लेबर कॉलनी यांसारख्या भागांतील गुन्हेगारांचा समावेश आहे. यातील अनेक आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत यापूर्वीच गुन्हे दाखल असून ते सातत्याने अशा कारवायांमध्ये गुंतलेले आढळले आहेत.
कठोर कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त सज्ज..
शहरातील अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी या गुन्हेगारांच्या आर्थिक आणि भौतिक स्रोतांवर आघात करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आणि महापालिकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात यावीत, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पोलीस विभागामार्फत चोख बंदोबस्त पुरवण्यात येईल, असं आश्वासनही देण्यात आलं आहे.