पुण्यातील सामूहिक (Pune Gang Rape) बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. पुण्यातील बोपदेव घाटात मित्रासोबत गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. 3 ऑक्टोबर रोजी रात्री 11-12 दरम्यान हा प्रकार घडला. या घटनेतील तीन दिवस उलटून गेले तरी अद्याप आरोपी सापडू शकलेले नाहीत. (Pune Bopdev Case)
पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. याशिवाय माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचं पोलिसांनी जाहीर केलं आहे.
दरम्यान या प्रकरणात पुण्यातील बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येत आहे. त्याआधारे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आलं आहे. आतापर्यंत पोलिसांकडून दोनशेहून अधिक सराईतांचीही चौकशी करण्यात आली आहे.
नक्की वाचा - पुणे बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण; पोलिसांकडून दोन आरोपींचे स्केच जारी
गेल्या 15 दिवसांत बोपदेव घाटमार्गातून गेलेल्या तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात आली आहे. त्यानुसार तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बोपदेव घाटातून सासवडकडे गेल्याचा संशय आहे. घाटापासून 70 ते 80 किलोमीटरपर्यंतचे सीसीटीव्ही
तपासले जात आहेत. मात्र अद्याप तरी आरोपींपर्यंत पोलीस अजूनही पोहोचू शकलेले नाहीत.
बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन संशयित आरोपींचं स्केच पोलिसांना जारी केले आहेत. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे विविध पथक आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच जवळचे सर्व सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासण्यात येत आहेत.
त्या रात्री नेमकं काय घडलं?
ही 21 वर्षीय तरूणी तिच्या मित्रासोबत फिरायला गेली होती. पुण्यातील बोपदेव घाटात हे दोघेजण रात्री 11 वाजता गेले होते. तो सर्व परिसर निर्मनुष्य होता. तिथं जवळपास कोणीच नव्हतं. त्याचाच गैरफायदा घेत तीन अज्ञान आरोपींनी या दोघांनाही दमदाटी केली. त्यांना भीती दाखवली आणि त्यानंतर तिघांनीही तरूणीवर अत्याचार केले. त्यानंतर तिघेही तिथून पसार झाले. या घटनेनंतर पीडित तरूणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्राईम ब्रँच आणि कोंढवा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.