रेवती हिंगवे, पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यात खून, दरोडे, मारामाऱ्यांचे सत्र सुरु आहे. अशातच आता पुण्यामधून एक मोठी बातमी समोर आली असून शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या भयंकर घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. काय आहे हे प्रकरण? वाचा सविस्तर...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारेवर गोळीबार करण्यात आला. पुण्यातील गणपती माथा परिसरात हा प्रकार घडला असून यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.
निलेश घारे हे गणपती माथा येथील जनसंपर्क कार्यालयात सहकाऱ्यांसोबत उपस्थित होते, त्याचवेळी बाहेर पार्क केलेल्या त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून घारे यांच्या गाडीवर गोळ्या झाडण्यात आल्या. सुदैवाने या हल्ल्यामध्ये निलेश घारे यांना कोणतीही इजा झाली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
( नक्की वाचा : Exclusive: काश्मीरला जा, फोटो घे... ISI एजंट आणि हेर यांच्यात काय झाली चर्चा? )
दुसरीकडे, वर्ध्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्धाच्या देवळी पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणा-या खर्डा शिवारात वर्धा नदीच्या पात्रात तांबा (येंडे) येथील गोपाळ उर्फ गोलू धनराज कुंभारे (वय 28) याचा मृतदेह आढळून आला. सुरूवातीला या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.
मात्र सखोल चौकशीत गोपाळ याची हत्या करून त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने नदीत फेकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे... या प्रकरणी देवळी पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपींनी रक्ताने माखलेले त्यांचे कपडे जाळून नष्ट केल्याचेही पोलिसांच्या चौकशीत पुढे आले आहे.