अजिंक्य धायगुडे-पाटील, प्रतिनिधी
Pune News: पुण्यातील कोथरूड परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली आहे. हुंड्यासाठी एका 18 वर्षांच्या विवाहितेचा छळ करून तिची हत्या केल्याचा खळबळजनक आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. अवघ्या 16 व्या वर्षी विवाहबंधनात अडकलेल्या या तरुणीचा संसार अवघ्या दोन वर्षांतच संपला. या घटनेमुळे पुण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय आहे प्रकरण?
मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव श्रुती सुनील बनसोडे असे असून, तिचा विवाह 28 मार्च 2024 रोजी बुद्धभूषण गायकवाड नावाच्या तरुणासोबत झाला होता. श्रुती आणि बुद्धभूषण यांचे एकमेकांवर प्रेम होते आणि त्यातूनच त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ज्यावेळी हे लग्न झाले, त्यावेळी श्रुतीचे वय अवघ्या 16 वर्षे इतके होते, अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली आहे. मुलगी अल्पवयीन असली तरी सामाजिक बदनामीच्या भीतीने तिच्या आई-वडिलांनी या लग्नाला संमती दिली होती.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
लग्नानंतर काही दिवसांतच श्रुतीचा छळ सुरू झाला. सासरच्या लोकांकडून तिला हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिचे नातेवाईक करत आहेत.
( नक्की वाचा : Yavatmal News: रात्री 2 वाजता नवरा ओरडला आणि बायकोचा भयंकर प्लॅन फसला; प्रियकरासोबत मिळून रचला होता कट )
विशेष म्हणजे, या त्रासाबाबत पोलिसात तक्रार केल्यास श्रुतीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी सासरच्या मंडळींनी दिली होती. याच धमकीमुळे पीडित मुलगी आणि तिचे कुटुंब आतापर्यंत गप्प होते, असे बोलले जात आहे.
माहेरच्यांकडून गंभीर आरोप
या प्रकरणाला 4 तारखेला गंभीर वळण मिळाले. त्या दिवशी श्रुतीला अचानक उलट्या आणि जुलाबाचा प्रचंड त्रास सुरू झाला. प्रकृती खालावल्याने तिला पुण्यातील एका खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान 5 मे 2026 रोजी तिची प्राणज्योत मालवली. श्रुतीचा मृत्यू नैसर्गिक नसून तिला जेवणातून विष देऊन मारण्यात आले आहे, असा थेट आरोप तिचे आई-वडील आणि नातेवाईकांनी केला आहे.
( नक्की वाचा : Shirdi News: 100 कोटींचा किराणा अन् 'असा' दर्जा? साई संस्थानच्या प्रसादालयातील 'त्या' पाहणीने खळबळ )
श्रुतीचा पती, सासू-सासरे आणि दीर या सर्वांनी मिळून तिचा छळ केला आणि तिला मृत्यूच्या दारात ढकलले, असा दावा करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून दोषींना अटक करावी, अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे. एक तरुण आयुष्य अशा प्रकारे संपल्यामुळे कोथरूड परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस आता या प्रकरणात काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.