रेवती हिंगवे, प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्रमुख पक्षांच्या नेत्यांचे दौरे, सभा, मेळावे, पदयात्रा यामुळे राजकीय वातावरण तापलंय. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुणे जिल्ह्यातील डोणजे गावचे माजी उपसरपंच आणि कंत्राटदार विठ्ठल पोळेकर यांचं अपहरण करुन हत्या झाली आहे. पोळेकर गुरुवारी (15 नोव्हेंबर) पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. त्यावेळी सकाळी 6 च्या सुमारास त्यांचं अपहरण झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आज (शुक्रवार, 16 नोव्हेंबर) त्यांचा मृतदेहाचे तुकडे खडकवासला धरणात आढळले. ओसाडे गावच्या हद्दीतील धरणाच्या पाण्यात त्यांच्या मृतदेहाचे तुकडे सापडले.
( नक्की वाचा : पुण्यातील नगरसेवकही होता निशाण्यावर, शिवकुमारच्या चौकशीत धक्कादायक खुलासा )
खंडणीसाठी हत्या?
कुख्यात गुंड बाबू मामे याने विठ्ठल पोळेकर यांचं अपहरण केलं होतं., अशी तक्रार पोळेकर यांच्या कुटुंबीयांनी पोलीसांकडे यापूर्वीच केली होती.बाबू मामे याने काही दिवसांपुर्वी विठ्ठल पोळेकर यांच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन जग्वार कार किंवा दोन कोटी रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली होती. याच मागणीच्या संदर्भात त्यानं पोळेकर यांचं अपहरण केलं होतं, असा त्यांच्या कुटुंबीयांचा दावा आहे. अपहरणानंतर 24 तासांमध्येच त्यांची हत्या झाल्याचं उघडकीस आलं. त्यामुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे.