पुण्यातील प्रसिद्ध Ernst & Young कंपनीच्या एका 26 वर्षीय चार्टर्ड अकाऊंटन्ट (Chartered Accountant) अॅना सेबेस्टियन पेरायिलच्या मृत्यूने देशभरात खळबळ उडाली आहे. पुण्यातील Ernst & Young ही कंपनी जगभरातील सर्वात मोठ्या अकाऊंटिंग फर्मपैकी एक आहे. अशा कंपनीत नोकरी मिळाल्यामुळे अॅना आनंदात होती. मात्र नोकरी मिळाल्याच्या अवघ्या चार महिन्यात तिच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. अॅनाच्या मृत्यूमागे तिच्या आईने कंपनीला दोषी ठरवलं आहे. तिच्यावर खूप जास्त कामाचा ताण दिला जात होता, यातूनच तिचा मृत्यू झाल्याचा दावा अॅनाच्या आईने केला आहे.
अॅनाची आई अनिता ऑगस्टीनने Ernst & Young या अकाऊंटिंग फर्मला पत्र लिहून संताप व्यक्त केला आहे. जास्त वर्कलोडमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. केरळच्या चार्टर्ड अकाऊंटन्ट अॅना सेबेस्टियन पेरायिलने मार्चमध्ये Ernst & Young कंपनी जॉइन केली होती. यानंतर अवघे चार महिने म्हणजे जुलै महिन्यात तिचा मृत्यू झाला. अॅनाची आई अनिताने Ernst & Young चे चेअरमन राजीव मेमानी यांना लिहिलेल्या पत्रात दु:ख व्यक्त केले की, कंपनीशी संबंधित कोणीच त्यांच्या मुलीच्या अंत्यसंस्कारात सामील झालं नाही.
नक्की वाचा -इडली खाताना श्वास अडकला अन् मृत्यू; ओनम सणाच्या दिवशी कुटुंबावर आघात
कामाचं ओझं, नवीन वातावरण आणि तासनतास काम करुन ती थकली होती. शारीरिक, भावनिक आणि मानसिकरित्या ती खचली होती. नवीन कंपनीत ती तणावात होती. मात्र अशा विपरीत परिस्थितीतही ती पुढे जात होती. तिला आशा होती की तिची मेहनत या सर्वांवर मात करेल, असं अनिता यांनी म्हटलं आहे. अॅना ज्यावेळी कंपनीत रुजू झाली त्यावेळी तिला सांगण्यात आलं की, येथे कामाच्या तणावातून अनेकांनी नोकऱ्या सोडल्या आहेत. त्यावेळी टीम मॅनेजमेंटने अॅनाला सांगितलं की, टीमबाबतचं हे मत तुला खोडून काढायचं आहे. मात्र माझ्या मुलीला पुसटशीही कल्पना नव्हती की यासाठी तिला जीव गमवावा लागेल.
नक्की वाचा - शेगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, 2 तास मिरवणुकीचा खोळंबा
अॅनावर असलेल्या कामाच्या तणावाबाबत अनिता यांनी लिहिलं की, अॅनाकडे एवढं काम होतं की, तिला आराम करण्यासाठी वेळ मिळत नसे. तिचा मॅनेजर अनेकदा क्रिकेट सामन्यांदरम्यान मीटिंग्ज रिशेड्यूल करायचे आणि दिवसाच्या शेवटी तिला काम सोपवायचे. ज्यामुळे तिचा ताण आणखी वाढला. माझ्या मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी तिच्या ऑफिसमधून कुणीही आलं नव्हतं. नवीन कर्मचाऱ्यांवर इतक्या प्रमाणात काम लादणे, रात्रंदिवसही काम करण्यासाठी दबाव टाकणे हे योग्य नाही. अॅनाचा मृत्यू कंपनीसाठी वेक-अप कॉल असायला हवा, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आम्ही तिला रुग्णालयात घेऊन गेलो...
अॅनाची आई ऑगस्टीन यांनी सांगितलं की, शनिवारी 6 जुलै रोजी त्या पतीसह अॅनाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी पुण्याला आल्या होत्या. दरम्यान अॅना गेल्या आठवड्याभरापासून रात्री उशीरा (रात्री 1 वाजेपर्यंत) आपल्या पीजीला पोहोचल्यानंतर मान आकडल्याची तक्रार करीत होती. यासाठी तिला पुण्यातील एका रुग्णालयात घेऊन गेलो. तिचा ECG नॉर्मल होता. तिला पुरेशी झोप मिळत नाही आणि ती उशीरा जेवत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी अपुरी झोप आणि अवेळी जेवणामुळे पोटात तयार झालेलं अॅसिड कमी करण्यासाठी औषधं दिली. आता सर्व ठीक असल्याचं वाटत होतं. मात्र तिने डॉक्टरांना दाखविल्यानंतर पुन्हा पहिल्यापासून काम करू लागली.
त्यांनी पुढे सांगितलं की, त्या दिवशीही तिला पीजी पोहोचायला उशीर झाला. रविवारी 7 जुलै रोजी आम्हाला दीक्षांत सोहळ्याला जायचं होतं. ती दुपारपर्यंत घरात काम करीत होती. त्यामुळे आम्हाला दीक्षातं सोहळ्याला पोहोचायला उशीर झाला. हा सोहळा आपल्या आई-वडिलांसोबत एन्जॉय करण्याची तिची खूप इच्छा होती. मात्र अतिरिक्त कामामुळे ती याचा आनंद घेऊ शकली नव्हती. तिने आपल्या आई-वडिलांचं फ्लाइटचं तिकीटही घेतलं होतं.
कामाचा लोड सहन झाला नाही अन्..
अॅनाने 2023 मध्ये सीएची परीक्षा उत्तीर्ण केली आणि मार्च 2024 मध्ये ती EY पुणे येथे कामास रुजू झाली. ही तिची पहिली नोकरी होती आणि कंपनीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ती कठोर परिश्रम घेत होती. पण , यामुळे तिच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होत होता. तिच्या आईने सांगितलं की, कामाला सुरुवात केल्यानंतर तिला चिंता, निद्रानाश आणि तणावाचा सामना करावा लागत होता. पण कठोर परिश्रम आणि चिकाटीमुळे यश मिळेल या विचाराने ती स्वतःला पुढे ढकलत होती. दरम्यान अॅनाच्या मृत्यूमागील नेमकं कारण अद्याप सनोर आलेलं नाही.