Pune News: नाशिकमधील एका विवाहित महिलेला पुण्यात ज्या भीषण मानसिक आणि कौटुंबिक छळाला सामोरे जावे लागले, ते ऐकून कोणाचेही मन सुन्न होईल. संशयाचे भूत माणसाच्या डोक्यात शिरले की नात्यातील विश्वास कसा जळून खाक होतो, याचे हे एक भयंकर उदाहरण समोर आले आहे.
या कुटुंबानं पोटच्या मुलांचे चेहरे पतीशी मिळत नाहीत, केवळ या एका संशयावरून सासरच्या मंडळींनी सुनेचे जगणे असह्य केले. चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले आणि स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी या मातेला चक्क मुलांची डीएनए चाचणी करण्याची वेळ आली. धक्कादायक म्हणजे, विज्ञानाने ती मुले पतीचीच असल्याचे सिद्ध करूनही या कुटुंबाने तिला स्वीकारण्यास नकार दिला आहे.
संशयाचे जाळे आणि सासरचा छळ
या प्रकरणातील पती आणि पत्नी दोघेही उच्चशिक्षित आहेत. पती पुण्यातील एका नामांकित खासगी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. लग्नानंतर हे कुटुंब पुण्यात सुखाने नांदत होते आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. मात्र, सुखाचा हा संसार विस्कळीत झाला तो नणंदेच्या एका संशयामुळे.
मुलांचे चेहरे भावासारखे दिसत नाहीत, असा दावा नणंदेने केला आणि तिथूनच वादाची ठिणगी पडली. सासू-सासऱ्यांनीही या संशयाला खतपाणी घालत सुनेचा छळ सुरू केला. एकदा तर ही महिला घराबाहेर असताना सासू-सासरे घराला कुलूप लावून गावी निघून गेले. हतबल झालेल्या पत्नीने पतीला फोन केला, पण त्यानेही साथ देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर संशय घेत मुलांचे वडील आपण नसल्याचा जावईशोध लावला.
( नक्की वाचा : Dombivli News: माझ्या खात्यात 2 कोटी 60 लाख आले कुठून? तरुणीच्या प्रश्नानं डोंबिवलीत खळबळ, वाचा काय आहे प्रकरण )
डीएनए चाचणीचा निकाल आणि पुढील संघर्ष
आपल्यावरील कलंक पुसण्यासाठी पीडित महिलेने स्वतःहून डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला. नातेवाईकांच्या उपस्थितीत पती आणि मुलांची डीएनए चाचणी करण्यात आली. या चाचणीच्या अहवालात ती मुले पतीचीच असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या स्पष्ट झाले. चारित्र्याच्या परीक्षेत ही महिला पूर्णपणे पास झाली, पण तरीही सासरच्या मंडळींचे मन विरघळले नाही.
सत्य समोर येऊनही पतीने आणि सासरच्या लोकांनी तिला व मुलांना घरात घेण्यास स्पष्ट नकार दिला. हक्काच्या घरातून आणि नात्यातून बाहेर काढल्यामुळे या महिलेने अखेर कायद्याचा दरवाजा ठोठावला आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.