रेवती हिंगवे, पुणे:
Pune Nilesh Ghaiwal News: पुण्यातील निलेश घायवळ टोळीला पोलिसांनी आणखी एक मोठा धक्का दिला आहे. निलेश घायवळ परदेशात पळाल्यानंतर आता पोलिसांनी त्याची टोळी खिळखिळी करण्याचा धडाका लावला आहे. पुणे पोलिसांनी घायवळ टोळीचा नंबरकारी असलेल्या अजय महादेव सरोदेला अटक केली आहे. त्याच्या घरावर टाकलेल्या धाडीतून 400 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
पुणे पोलिसांची मोठी कारवाई!
समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा नंबरकारी आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला अजय सरोदे याला पुणे पोलिसांनी अटक केली असून पोलिसांनी केलेल्या छापेमारी मधून धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. अजय सरोदे याच्या घरी तब्बल 400 काडतूस सापडले असून त्यापैकी तब्बल 150 राऊंड या आरोपीने हवेत फायर केली असून या रिकाम्या पुंगळ्या देखील पोलिसांना आढळून आल्या आहेत.
अजय सरोदे आणि बटर्या चौधरी या दोघांना कोथरूड पोलिसांनी गाणगापूर, कर्नाटक येथून केली तीन दिवसांपूर्वी अटक केली. त्या दोघांच्या चौकशीत सोनेगाव या गावी जाऊन निलेश घायवळ याने बैलपोळ्या दिवशी हे 150 राऊंडस फायर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता निलेश घायवळ याच्यावर देखील अजून एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
निलेश घायवळविरोधात रेड क्रॉस नोटीस काढणार!
दुसरीकडे, परदेशात असलेल्या निलेश घायवळच्या मुसक्या आवळण्याचा प्लॅनही पुणे पोलीस करत आहेत. निलेश घायवळ याच्या विरोधात पुणे पोलिसांनी रेड क्रॉस नोटीसची प्रोसेस सुरू केलेली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुणे पोलिसांनी CID, गुन्हे शाखा, इंटरपोल आणि इतर विभागासोबत सगळे पत्र व्यवहार सुरू केले असून लवकरच निलेश घायवळ याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात येणार असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितले आहे.
(नक्की वाचा- Shocking! प्रेमविवाहानंतर हुंड्यासाठी छळ, IAS अधिकाऱ्याच्या मुलीने संपवलं जीवन)