हातभट्टीतून 800 रुपयांचा फायदा, 'ते' द्रव्य ऑनलाइन मागवलं अन् 18 जणांचा मृत्यू; योगेशने मांडला मृत्यूचा बाजार

पुण्यातील दारुकांड प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. फक्त ८०० रुपयांच्या फायद्यासाठी १८ जणांचा बळी गेला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

Pune Liquor Tragedy: पुण्यातील दारुकांड प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. फक्त ८०० रुपयांच्या फायद्यासाठी १८ जणांचा बळी गेला आहे. मुख्य आरोपी योगेश वानखेडे विषारी दारू तयार करायचा. यामागील मोडस ऑपरेंडी अत्यंत धक्कादायक होती. या घटनेनंतर शहरातील दारुचे अड्डे पोलिसांच्या निशाण्यावर आहेत.

६ हजारांच्या फायद्यासाठी १८ जणांचा घेतला जीव   

मिळालेल्या माहितीनुसार, हातभट्टीच्या दारूच्या एका कॅनमागे ८०० रुपयाच्या फायद्यासाठी विषारी दारू बनवली जात होती. मुख्य आरोपी योगेश वानखेडेनं फक्त ६ हजार ६०० रुपयांसाठी १८ जणांचा जीव घेतला आहे. योगेश वानखेडेनं दारुमध्ये मिथेनॉल मिसळल्याचंही सांगितलं जात आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विषारी दारूमुळे १८ जणांचा बळी गेला असून ८ पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. ..

Advertisement

योगेश वानखेडे हा गेल्या तीन ते चार वर्षांपासून उरळीकांचनमधल्या राधेश्याम प्रजापतीकडून हातभट्टीची दारू विकत घ्यायचा. ३५ लिटर दारुचे कॅन तो १९०० रुपयांना विकत घ्यायचा आणि दारुच्या गुत्त्यावर तो २७०० रुपयांना  विकायचा. या कॅनमध्ये तो मिथेनॉल मिक्स करायचा आणि मग त्याची विक्री हडपसर, गोखलेनगर, फुगेवाडी, बोपोडी परिसरातल्या दारूच्या गुत्त्यांवर करायचा. योगेश वानखेडेनं ८४० लिटर मिथेनॉल मिश्रित दारू तयार केली होती. त्यापैकी २०० लिटर दारू विकली गेली. हडपसरमधून 70 लीटर,  गोखलेनगरमधून ४२० लीटर, तर दापोडी आणि फुगेवाडीमधून १५५ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. 

नक्की वाचा - Shirdi News : 14 जण दगावले, तरीही हातभट्टी दारूचं व्यसन कमी होईना; मद्यपींची धक्कादायक मागणी

योगेश वानखेडेनं पंधरा दिवसांपूर्वीच इंडिया मार्ट या ऑनलाइन वेबसाइटवरून २१५ लिटर मिथेनॉल विकत घेतलं होतं. कॅनमागे ८०० रुपयांचा फायदा व्हावा यासाठी योगेश त्या कॅनमध्ये मिथेनॉल मिसळून विकायचा. दारुमधली नशा वाढावी यासाठी मिथेनॉल मिसळलं जायचं अशी माहिती आहे. हे मिथेनॉल मिसळल्यामुळेच दारु विषारी होते आणि थेट मृत्यू होतो.  

हातभट्टीची दारू विषारी कशी होते? 


मोहाची फुलं, ऊस, खजूर, साखर, जवस, मका, नासलेली द्राक्षं, बटाटे, तांदूळ, खराब झालेल्या संत्र्यांपासून हातभट्टीची दारू तयार केली जाते. स्टार्च असलेल्या गोष्टी एकत्र करुन त्यात यीस्ट टाकतात. हे सगळं मिश्रण आंबवायला ठेवलं जातं. नशा जास्त होण्यासाठी युरिया किंवा बेसरमबेलची पानं टाकतात. हे मिश्रण सडवण्यासाठी ऑक्सिटोसिन वापरलं जातं. ऑक्सिटोसिन - युरिया एकत्र आल्यावर मिथाईल अल्कोहोल तयार होतं. मिथाईल अल्कोहोल दारुला विषारी बनवतं. मिथाईल अल्कोहोल शरीरात गेल्यावर केमिकल रिअॅक्शन सुरू होते. मिथाईल अल्कोहोल शरीरात गेल्यावर फॉर्मेल्डाईड विष तयार व्हायला सुरुवात होते. मिथाईल अल्कोहोलचं प्रमाण वाढलं की, शरीरात फॉर्मिक अॅसिड तयार होतं. या सगळ्याचा परिणाम थेट मेंदूवर होतो. उलट्या, जळजळ आणि खोकला सुरू होतो. शरीरातला एकेक अवयव निकामी होत जातो. काही जणांवर हळूहळू, तर काही जणांवर तत्काळ विषाचा परिणाम होतो. वेळेवर इलाज न झाल्यास मृत्यू होतो. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या दहा रुपयात पिशवीतून ही हातभट्टीची दारू विकली जाते. 

या दारुकांड प्रकरणी पुण्यातील तब्बल ९ पोलिसांना निलंबित केलं आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा आणि पर्यवेक्षणाचा अभाव असा ठपका ठेऊन ९ पोलिसांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पुण्यातल्या या दारुकांडानंतर काँग्रेस आणि सामाजिक संघटनांनी पुण्यात जोरदार आंदोलनं केली आहेत. पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसनं निदर्शनं केली आहेत. तर दुसरीकडे गुलाबो गँगही रस्त्यावर उतरली आहे. पुण्यातल्या या दारुकांडानंतर आता पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. आता शहरातले दारुअड्डे पोलिसांच्या निशाण्यावर आहेत. 

Advertisement